Mon, Jan 27, 2020 11:26होमपेज › Konkan › सिंधुदुर्गमध्ये आज मतदान

सिंधुदुर्गमध्ये आज मतदान

Published On: Apr 23 2019 1:34AM | Last Updated: Apr 22 2019 10:55PM
कणकवली : प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सिंधुदुर्गातील 915 मतदान केंद्रांवर  मंगळवार (दि. 23) स.7 ते सायं. 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्ह्यात अडीच हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

सोमवारी सकाळी वोटिंग मशीन, व्हीव्हीपॅट मशीनसह कर्मचारी, अधिकारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले.  मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 5035 कर्मचारी केंद्रांवर नियुक्‍त करण्यात आले आहेत. 

गेला महिनाभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीतर्फे विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे नीलेश राणे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत विनायक राऊत विरुद्ध नीलेश राणे यांच्यात होणार आहे.  मंगळवार 23 एप्रिल रोजी सकाळी 7 वा. पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. त्या आधी सकाळी 6 ते 7  या वेळेत प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर 7 वा.पासून मतदारांना मतदानाचा हक्‍क बजाविता येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गेला महिनाभर जनजागृती करण्यात आली होती. सिंधुदुर्गात या निवडणुकीसाठी 6 लाख 66 हजार 720 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. यावेळी प्रथमच जिल्ह्यात 3 ‘सखी मतदान केंद्रे’ उभारण्यात आली आहेत. 2014 साली या मतदारसंघात 64 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे ही टक्केवारी वाढणार का? याबाबत उत्सुकता आहे. 

प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष आणि तीन निवडणूक कर्मचारी असे 4028 कर्मचारी नियक्‍त करण्यात आले आहेत. 92 कर्मचारी राखीव आहेत. तसेच  915 पोलिस कर्मचारी प्रत्येक केंद्रावर असणार आहेत. सोमवारी सकाळी प्रत्येक केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रक्रियेचे साहित्य घेऊन रवाना झाले. यासाठी एसटी बसेस, खासगी बसेस देण्यात आल्या आहेत. या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक तैनात करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र पोलिसांसह परराज्यातील पोलिस कर्मचारीही बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. सशस्त्र पोलिस, दंगाकाबू पथक, एसआरपी प्‍लाटून आणि स्थानिक पोलिस असा मोठा फौजफाटा जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. 

मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पोलिसांनी मतदारांमध्ये निर्भयतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी संचलन केले. जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाकाबंदी, पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. वाहनांचीही कसून तपासणी केली जात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आणि निवडणूक यंत्रणेची करडी नजर आहे.