Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Konkan › पोटनिवडणुकीसाठी 57.21 टक्के मतदान

पोटनिवडणुकीसाठी 57.21 टक्के मतदान

Published On: Apr 06 2018 11:38PM | Last Updated: Apr 06 2018 11:34PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शिवसेना, भाजप नगरसेविकांची किरकोळ बाचाबाची वगळता प्रभाग क्र. 3 ‘ब’ च्या निवडणुकीचे मतदान शुक्रवारी शांततेत पार पडले. 3335 मतदारांपैकी 1908 मतदारांनी आपला हक्‍क बजावला. 57.21 टक्के इतके मतदान असून, वर्षभरापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत याच प्रभागातून 3100 मतदारांपैकी 1892 इतके मतदान झाले होते. मतमोजणी 12 एप्रिल रोजी होणार आहे.

शहराच्या प्रभाग क्र. 3 ‘ब’ ची निवडणूक फारच प्रतिष्ठेची झाली. या पोटनिवडणुकीसाठी तीनपैकी शासकीय वसाहतीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये दोन मतदान केंद्रे होती. त्यामुळे या मतदान केंद्राजवळ तिन्ही उमेदवार, अख्खी शिवसेना आणि भाजपची टीम उपस्थित होती. शिवसेनेचे आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी जातीने उपस्थित होते. 
भाजपचेही नगरसेवक, नगरसेविकांसह सर्व पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते.

सकाळच्यावेळी मतदान शांततेत सुरू असतानाच महिला नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. या निशाणीचे बटण दाबा असे सांगण्यावरून ही शाब्दीक बाचाबाची झाली. मात्र, थोड्या वेळाने दोन्ही पक्षांच्या नगरसेविका रागरूसवे विसरून गेल्या. शिवसेनेचे राजन शेट्ये, भाजपचे वसंत पाटील, राष्ट्रवादीचे सनीफ गवाणकर हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. 3335 मतदारांना तीन मतदान केंद्रांवर मतदान करायचे होते. यातील दोन मतदान केंद्रे शासकीय वसाहतीच्या हॉलमध्ये होती. तिन्ही मतदान केंद्रांवर 1908 इतके म्हणजे 57.21 टक्के मतदान झाले आहे. यापूर्वीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये याच प्रभागात 3100 मतदार होते.

त्यातील 1852 मतदारांनी आपला हक्‍क बजावला होता. यावरून ज्या प्रमाणात मतदार वाढले आहेत त्याप्रमाणात मतदान झाले नाही. त्यावेळी या प्रभागात 61 टक्के मतदान झाले होते. युवा नेते राजेश सावंत यांनी शिवसेनेच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या रिक्‍त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. राजेश सावंत शिवसेना सोडून भाजपमध्ये गेल्याने दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली. त्यानुसारच दोन्ही पक्षांकडून प्रचाराची राळ उठवली गेली. भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना कल्पक रणनीती राबवली.
 

Tags : Polling Election,  Voting, Ratnagiri