Wed, Apr 24, 2019 21:53होमपेज › Konkan › राजकारणात वट असल्यानेच मी खासदार 

राजकारणात वट असल्यानेच मी खासदार 

Published On: Apr 05 2018 11:19PM | Last Updated: Apr 05 2018 11:18PM कणकवली :  प्रतिनिधी

माझी राजकीय ताकद असल्यानेच भाजपच्या मदतीने आपण खासदार झालो आहे. भाजपने मग प्रमोद जठार किंवा इतरांना खासदारकी का दिली नाही? रिफायनरी प्रकल्प भाजपने आणला असला तरी कोकणी जनतेच्या भल्यासाठीच आपला त्या प्रकल्पाला विरोध कायम राहील असे स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट 
केले.

जानवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संदीप कुडतरकर, सुरेश सावंत उपस्थित होते. खा. राणे म्हणाले, वरवडे गावाचा सर्वांगीण विकास आपण केला. रस्ते, आरोग्यकेंद्र, डॉन बॉस्को स्कुल आणि आता श्रीदेव रामेश्‍वराचे मंदिर ही व इतर अनेक विकासकामे केली. एवढेच नव्हे तर जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास केला. रेडी बंदराचे काम आपण सुरू केले. चिपी विमानतळाच्या कामाला मंजुरी आणून तेही काम सुरू केले. सी वर्ल्ड प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचा निधी आणला होता.

आताही नगरविकास खाते असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे माझीच वट आहे हेही लक्षात ठेवावे. जिल्ह्यात भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची ताकद कमी होत चाललेली आहे. कारण विकासाचे काम त्यांच्याकडून होत नाही. संसदेत खासदारपदाची शपथ आपण घेतली. त्यामुळे असंसदीय शब्दांचा वापर करण्याची आपल्याला आवश्यकताच नाही असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना खा. नारायण राणे यांनी सांगितले. 

जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करून हा जिल्हा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. यापुढे आपण खासदार असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध होणार आहे. प्रमोद जठार असो की संदेश पारकर, त्यांच्यामध्ये विकास करण्याची धमक नाही. निधी आणण्याची पात्रता नाही. त्यामुळे त्यांचे जे आरोप व टीका माझ्यावर केली जाते त्याकडे सिंधुदुर्गातील जनता कधीही लक्ष देणार नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Tags : Politics, Politics Power,  Member of Parliament, MP, Narayan Rane, Kankavali