Fri, Jan 24, 2020 21:42होमपेज › Konkan › प्रचार तोफा आज थंडावणार

प्रचार तोफा आज थंडावणार

Published On: Apr 21 2019 1:40AM | Last Updated: Apr 20 2019 10:10PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान होत असल्याने 48 तास आधी रविवारी सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेला दीड महिना अर्ज भरण्यापूर्वीपासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. या मतदारसंघात शिवसेना व स्वाभिमानमध्ये खर्‍या अर्थाने लढत होत आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडूनही घराघरांत-वाड्या-वस्त्यांवर प्रचार सुरू आहे. मात्र, खरी रंगत शिवसेना व स्वाभिमानमध्येच पाहायला मिळाली. मोठ्या मान्यवरांच्या सभा फारशा रंगल्या नाहीत.

शिवसेनेतर्फे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन जाहीर सभा रत्नागिरीत देवरूख व सिंधुदुर्ग तसेच कुडाळमध्ये घेतल्या. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी गुहागर शृंगारतळी येथे सभा घेतली. स्वाभिमानतर्फे खासदार नारायण राणे यांनी एक हाती किल्‍ला लढवला. काँग्रेसच्या उमेदवारांनी शेवटच्या दोन दिवसांत प्रचाराचे नारळ वाढवले. वंचित बहुजन आघाडीने वाड्या-वस्त्यांवर प्रचाराचे लक्ष केंद्रित केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, चार ते पाच उमेदवारांशिवाय अन्य उमेदवारांचे चेहरेही मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे प्रमुख पक्षांमध्येच ही लढत होत असून, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना किती मते पडतात, त्यावरुन विजयाचे पारडे कुणाकडे झुकते व किती मताधिक्क्य मिळते याकडे लक्ष राहणार आहे.

छुप्या प्रचाराची रणनिती

रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून प्रचार थांबणार असल्याने दोन दिवस छुप्या प्रचाराची रणनिती व कोणकोणत्या भागात कार्यरत आहे, याचा लेखाजोखा ठेवण्याचे  काम कार्यकर्त्यांकडे सोपवले जाणार आहे. रात्रीच्या रात्री वाड्यावस्त्यांवरील मते फुटू नयेत यासाठीही रणनीती राजकीय पक्षांकडून आखली जात आहे.

मतदान पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिसांचे रत्नागिरीत संचलन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिसांच्या मदतीला परजिल्ह्यातील पोलिस कर्मचार्‍यांसह राज्य राखीव दलाचे जवान दाखल झाले आहेत. पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व बंदोबस्ताची व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी रत्नागिरी पोलिसांनी शहरातून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संचलन केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी   -रायगड  लोकसभा मतदारसंघासाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे.   मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या मदतीला उस्मानाबाद येथील तीनशे पोलिस, रेल्वे पोलीस बलाचे 375 पोलिस कर्मचारी, नाशिक एमपीएचे 100 पोलिस कर्मचारी रत्नागिरीत शनिवारी दुपारपर्यंत दाखल झाले. 

त्याचप्रमाणे एक राज्य राखीव दलाची तुकडीह शनिवारी सायंकाळी दाखल झाली तर मध्यप्रदेश राज्य राखीव पोलिस दलाची 100 कर्मचारी तसेच अधिकार्‍यांची कंपनी रविवारी रत्नागिरीत दाखल होईल, असे सांगण्यात आले. अमरावती, बडनेरा येथून ही कंपनी कोल्हापूर येथे रविवारी येईल व तेथून खासगी बसने रत्नागिरीत दाखल होणार आहे.

रत्नागिरी पोलिस व परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना घेऊन शनिवारी सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड,  उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक निशा जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्यासह अन्य अधिकारी या संचलनात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून संचलनास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बाजारपेठेतून हे संचलन करण्यात आले.

यावेळी प्रथमच पोलिसांसाठी निवडणूक निरीक्षक

मतदान केंद्राची सुरक्षा, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षा, मतदान यंत्रांची वाहतूक या दृष्टीने जिल्ह्यात पोलिस बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. याबरोबर यावेळी प्रथमच पोलिस खात्यासाठी निवडणूक निरीक्षकांची स्वतंत्र नियुक्‍ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक सुरक्षा तसेच बंदोबस्ताची माहिती घेत आहेत.