Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Konkan › स्वाभिमानकडून अभियंता धारेवर

दूरसंचार सेवेबाबत राजकीय पक्ष आक्रमक

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 10:48PMमालवण : प्रतिनिधी  

मालवण- बिळवस येथील बीएसएनएलचे एक्स्चेंज बंद पडल्याने तसेच तालुक्यातील दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने सोमवारी संतप्त दूरध्वनी ग्राहक तसेच स्वाभिमान पक्ष व मनसेच्या पदाधिकार्‍यांनी  मालवण बीएसएनएल कार्यालयावर स्वतंत्रपणे धडक देत अधिकार्‍यांना  धारेवर धरले. येत्या आठवडाभरात तालुक्यातील दूरध्वनी सेवा सुरळीत न  झाल्यास  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी दिला तर मनसे कार्यकर्त्यांनी दूरसंचार कार्यालयात अधिकार्‍यांना कोंडून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. 

आंगणेवाडी, बिळवस, भोगलेवाडी, माळगाव, महान, कांदळगाव या दशक्रोशीतील  दूरध्वनी व इंटरनेट सेवा गेले दहा दिवस ठप्प असल्याने येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली  विकास सावंत,  दिनेश आंगणे, सुभाष आंगणे रामकृष्ण पालव, सूरज पालव, पंकज आंगणे, श्री. भगत यांसह बहुसंख्य ग्रामस्थांनी बीएसएनएलचे अधिकारी श्री. कसबे यांना जाब विचारला.  बिळवस एक्सचेंजच्या समस्या मांडत प्रश्‍नांची सरबत्ती केली.

बिळवस  दशक्रोशीतील दूरध्वनी व इंटरनेट सेवा ठप्प आहे. याबाबत पाच दिवसांपूर्वी लक्ष वेधूनही अद्याप कार्यवाही झालेेली नाही.  ग्राहक बिलाची पूर्ण रक्कम भरतात मग  गरजेच्या वेळी सेवा मिळत नसेल तर उपयोग काय? पावसात इतर कंपन्यांची सेवा सुरळीत सुरू असताना बीएसएनएलची सेवा का ठप्प होते? असे प्रश्‍न श्री. सावंत यांनी केले. या भागातील अनेक ग्राहकांचे टेलिफोन संच नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्त अथवा नवीन देण्यात आलेले नाहीत. बिळवस एक्सचेंजवर एकही सक्षम कर्मचारी नाही.  प्रभारी कर्मचार्‍याने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. यामुळे ग्राहकांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. येत्या सात दिवसांत बिळवस एक्सचेंज सुरू  न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अशोक सावंत यांनी दिला.

अधिकार्‍यांशी शाब्दिक चकमक 

अशोक सावंत यांनी समस्यांबाबत बीएसएनएल अधिकारी श्री. कसबे व कनिष्ठ अधिकारी श्री. ढवळे यांना धारेवर धरले. श्री.ढवळे आणि अशोक सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.  श्री. सावंत यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत समस्या मांडून त्यांनाही खडेबोल सुनावले.

कर्मचार्‍याचा पगार थकित

बिळवस एक्सचेंजमध्ये काम करणार्‍या कंत्राटी कामगार श्री. कुंभार यांनी यावेळी आपला सहा महिन्यांचा पगार थकित असल्याची माहिती दिली. यामुळे संतापलेल्या अशोक सावंत यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेत कुंभार यांचा थकित पगार तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आल्यानंतर वेतन देण्याबाबत आश्‍वासन देण्यात आले. श्री. कसबे व श्री. ढवळे यांनी काही ठिकाणी वीज पडतल्याने बीएसएनएल यंत्रणेत बिघाड झाला आहे.  खंडित वीज पुरवठ्यामुळे व कर्मचार्‍यांची कपात झाल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. 

मनसेचा टाळे ठोकण्याचा इशारा

मालवण तालुक्यात विस्कळीत झालेल्या बीएसएनएलच्या सेवेबाबत तसेच बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या कामचुकारपणाबाबत तालुका मनसेच्या कार्यकर्त्यांनी बीएसएनएलच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. कर्मचारी कपात तसेच कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांच्या दूरध्वनी समस्या सोडविल्या जात नसल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  येत्या आठ दिवसांत पुरेसे कर्मचारी उपलब्ध न केल्यास तसेच बीएसएनएल सेवा सुरळीत सुरू न केल्यास  कार्यालयाला टाळे लावून अधिकार्‍यांना कोंडू, असा आक्रमक इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. 

बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराबाबत सोमवारी मालवण तालुका मनसेच्या पदाधिकार्‍यांनी बीएसएनएलचे अधिकारी श्री. कसबे व श्री. ढवळे यांना जाब विचारला. मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपुरकर, पास्कल रॉड्रीक्स, विल्सन गिरकर, निशाय पालेकर, विनायक गावडे, अल्बर्ट रॉड्रीक्स आदी उपस्थित होते.
इतर दूरध्वनी कंपन्यांची सेवा पावसाळ्यात सुरळीत असताना फक्त बीएसएनएल सेवेला समस्या कशा उद्भवतात? 

असा सवाल विनोद  सांडव यांनी  केला. देवबाग येथे गेले अनेक दिवस बीएसएनएल सेवा विस्कळीत होत असताना  बीएसएनएल कर्मचारी ग्राहकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यास कामचुकारपणा करत असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. पूर्वी देवबागमध्ये चांगली सेवा देणार्‍या श्री. होडावडेकर यांना कामावरुन कमी केल्याने देवबागवासीयांच्या अडचणीत वाढ झाल्याचा दावा  पास्कल रॉड्रिक्स यांनी केला.

आपला दूरध्वनी बंद पडल्याबाबत कर्मचार्‍याला वारंवार सांगूनही समस्या सोडविण्यात आली नसल्याची तक्रार मसुरे येथून आलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांनी अधिकार्‍यांसमोर मांडली. याबाबत मनसे पदाधिकार्‍यांनी  अधिकार्‍यांना धारेवर धरले. कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठांना कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागत आहे. त्यांना नाहक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सदर कर्मचार्‍यांना योग्य ती समज द्यावी, असे सुनावले.

कर्मचारी व अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी प्रलंबित रहात आहेत. येत्या आठ दिवसांत तालुक्यातील बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकून तुम्हाला कोंडून ठेवू, असा इशारा  मनसे पदाधिकार्‍यांनी दूरसंचार अधिकार्‍यांना दिला.