Sat, Jul 20, 2019 02:36होमपेज › Konkan › शिमगोत्सवात वाजताहेत राजकीय ढोल!

शिमगोत्सवात वाजताहेत राजकीय ढोल!

Published On: Mar 05 2018 9:05PM | Last Updated: Mar 05 2018 9:00PMचिपळूण : खास प्रतिनिधी

कोकणचा प्रमुख सण  म्हणून शिमगोत्सवाला महत्त्व आहे.आता या सणाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. यानिमित्ताने विविध राजकीय पक्षांचे पुढारी देखील ही संधी साधून लोकांच्यात मिसळत आहेत. यामुळे शिमग्यात राजकीय ढोलदेखील घुमू लागले आहेत.

लोकं एकत्र आली आणि त्या ठिकाणी राजकीय पुढारी आले नाहीत  तर सगळ्यांनाच नवल वाटेल. त्यामुळे शिमग्याची संधी घेत राजकीय पुढारी आता गावदेवीच्या पालखीप्रमाणे गावागावांत फिरू लागले आहेत. 

या सणाला मुंबई ,पुणेकर चाकरमानी गावात येतात. गावच्या लोकांची जाबाबदारी हे चाकरमानी सांभाळत असतात. या चाकरमान्यांची गाठ भेट घ्यावी, गावातील लोकांचा कल बघावा, या हेतूने राजकीय पुढार्‍यांचा फेरा सुरु झाला आहे. यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांच्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीला आता वर्ष उरले आहे. याची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळे या शिमगोत्सवावर राजकीय मेहरनजर होताना दिसत आहे. शिमग्यानिमित्त आयोजित होणार्‍या कार्यक्रमांना हे पदाधिकारी उपस्थिती लावत आहेत. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा भावनेतून दौरे सुरु झाले आहेत. आमदार,  खासदार, नगराध्यक्ष, सभापती, पं.स, जि.प.सदस्य अगदी नगरसेवकदेखील या उत्सवाचा उपयोग करून घेत आहेत.

शिमगोत्सवात गाव देवतांच्या पालख्यांचा नाचविण्याचा कार्यक्रम होतो. याठिकाणी अनेक पदाधिकारी आपल्या नावाचे टी-शर्ट भक्‍तांना देत आहेत. यावर्षी फ्लेक्स कमी झाले असले तरी अन्य मार्गाने राजकीय पुढारी ढोल वाजवीत आहेत.

आगामी निवडणूक चौरंगी होण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पदाधिकार्‍यांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. गाव बैठका, चाकरमान्यांच्या बैठका आणि गाठीभेटीवर जोर देण्यात येत आहे. या बैठकांमधून गावाच्या समस्या, रस्ते, पाणी, वीज, आगामी काळात येणारी पाणीटंचाई याविषयी आराखडे आणि आश्‍वासने देण्यात येत आहेत. 

होळीच्या रंगात राजकीय रंग देखील उडविला जात आहे. पालखी नाचविणे, देवदेवतांचे दर्शन, परंपरागत कार्यक्रमात हजेरी, महाप्रसादाला उपस्थिती, सत्यनारायण महापूजा दर्शन अशा कार्यक्रमाला आता मान्यवरांची उपस्थिती लाभत आहे. शिमग्या निमित्त आयोजित करण्यात येणार्‍या पालखी नृत्य स्पर्धेलादेखील आता मोठा राजाश्रय मिळत आहे. त्यामुळे शिमग्यात राजकीय ढोलांचा आवाज जोरदारपणे घुमत आहे.