Mon, Jan 27, 2020 11:00होमपेज › Konkan › पुढार्‍यांची फेरी बाप्पांच्या दर्शनाला..! 

पुढार्‍यांची फेरी बाप्पांच्या दर्शनाला..! 

Published On: Sep 17 2018 1:22AM | Last Updated: Sep 16 2018 8:54PMचिपळूण : समीर जाधव  

अलीकडे सण उत्सवांमध्ये राजकारण शिरू लागले आहे. मग त्यामध्ये गणेशोत्सव कसा मागे राहील? गणेशोत्सवानिमित्त आता राजकीय पुढार्‍यांची फेरी गणेश दर्शनाला बाहेर पडली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या गाठीभेटी घेण्याचे पुढार्‍यांनी या  उत्सवानिमित्त साधले आहे.

नुकताच गोपालकाला कसा राजकीय हंडी झाला आहे, याचा नमुना सर्वांनी पाहिला. त्यामुळे आता सर्व सण उत्सवात देखील राजकारण शिरले आहे. दसरा, दिवाळी, गणपती उत्सव, नवरात्र, शिमगोत्सव या बरोबरच रमजान महिना, ख्रिसमस अशा अन्य धर्मीय सणातही राजकीय वावर होताना पहायला मिळत आहे. आता तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय मंडळी देवदर्शन करताना गाठीभेटी घेत आहेत. 

कोकणात गणेशोत्सवाला चाकरमानी हमखास येतात.  कोकणाची भिस्त अजूनही चाकरमान्यांवर आहे. त्यामुळे गणेश दर्शनाच्या निमित्ताने आपला मतदार, कार्यकर्ता आणि चाकरमान्यांच्या एकत्र भेटी होतील, यासाठी सर्वच पक्षाचे पदाधिकारी सरसावले आहेत. सरपंचासह जि.प., पं. स. सदस्य, नगरसेवक आणि आमदार-खासदार तसेच भावी उमेदवार   आपापल्या मतदारसंघात गणेश दर्शन करू लागले आहेत. 

राज्य म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत, आ. सदानंद चव्हाण, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आ. संजय कदम, आ. राजन साळवी यांच्याबरोबर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र वायकर हे देखील आघाडीवर आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, निवडणुकीसाठी उपयोगी पडणारे ताकदीचे पदाधिकारी, सरपंच, स्थानिक कार्यकर्ते यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मान्यवर निघाले आहेत. 

अनेक ठिकाणी गाठीभेठी सुरु आहेत. यानिमित्ताने तेथील समस्या आणि आश्‍वासनांचा शब्द अशी मोहीम राजकीय पुढार्‍यांनी आखली आहे. निवडणुका जवळ आल्याने संपूर्ण दिवसभर  हा दौरा सुरु आहे. चिपळूण विधानसभा  मतदारसंघात आ. सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम यांच्यात चुरस आहे. त्यामुळे  चव्हाण आणि निकम यांनी मतदारसंघात संपर्काची जोरदार मोहीमच सुरु केली आहे. त्यात आता भाजपाने उडी घेतली असून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल हे देखील गणेश दर्शन मोहिमेवर निघाले आहेत. 

खेड, दापोली आणि मंडणगड विधानसभा मतदारसंघात आ. संजय कदम यांचा दौरा सुरु आहे. तेथे स्पर्धेत असणारे ना. रामदास कदम यांचे सुपुत्र आणि योगेश कदम हे देखील गणेश दर्शन मोहिमेत आघाडीवर आहेत. सणाच्या निमित्ताने मतदार संघात आपला संपर्क वाढविण्यासाठी राजकीय पुढारी सरसावले आहेत.

आ. भास्कर जाधव यांच्या सोशल मीडियावरून शुभेच्छा

गुहागर विधानसभेचे आ. भास्कर जाधव यावर्षी गणेश दर्शनासाठी मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने ते विश्रांती घेत आहेत. मात्र, दरवर्षी ते मतदारसंघात गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाकरमानी आणि गावकर्‍यांची भेट घेत असतात. यंदा मात्र हि संधी हुकल्याने त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. आपले कार्यकर्ते, सरपंच , प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्याकडे जाता येत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधत त्यांनी शुभेच्छा मोहीम सुरु केली आहे.