Sun, May 26, 2019 21:46होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’च्या ४१ जणांना व्हॅनमध्ये कोंबले!

‘स्वाभिमान’च्या ४१ जणांना व्हॅनमध्ये कोंबले!

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 10:52PMसावंतवाडी ः प्रतिनिधी 

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची इमारत गेल्या आठ वर्षांपासून अपूर्णावस्थेत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सावंतवाडीच्या वतीने बांधकाम अधिकार्‍यांना घेराओ घालण्यासाठी व काळे फासण्याच्या उद्देशाने आलेल्या 41 आंदोलकांना पोलिसांनी गेटवर अडवून पोलिस व्हॅनमध्ये कोंबले. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास पोलिसांनी विरोध केल्याने गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

सावंतवाडी स्वाभिमान पक्षाच्या वतीने वेळोवेळी अपूर्ण असलेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देण्यात आली होती. परंतु, आठ वर्षे होऊनही या इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने तहसील कार्यालयात बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विविध दाखल्यांच्या कामी होणार्‍या त्रासाकडे लक्ष वेधून सा.बां. विभागाने ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करावी, या मागणीसाठी लेखी निवेदने आणि आंदोलने करूनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सोमवार 2 जुलैला स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीसह पदाधिकार्‍यांनी बांधकाम कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्याचा आणि तोंडाला काळे फासण्याचा निर्णय सोमवारच्या तालुका कार्यकारिणी बैठकीमध्ये घेण्यात आला. 

तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकारिणी बैठकीचे ठिकाण श्रीराम वाचन मंदिर सभागृहातून चालत सा.बां. कार्यालयावर धडकण्यासाठी आले असता या कार्यकर्त्यांना सावंतवाडी पोलिसांनी गेटवरच अडवून फक्त 5 कार्यकर्ते चर्चेसाठी जाऊ शकतात, असे सांगितले. मात्र, सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी असून सर्वजण आत जाणार असल्याचा इशारा संजू परब यांनी दिला. 

अर्धा तास पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी कार्यकर्त्यांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यापासून अडविण्याचा आदेश गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला असल्याचा आरोप करत ना. केसरकर यांच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. सा.बां. कार्यालयाच्या गेटवर पोलिसांचे कडे तोडून 
आत घुसण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी संजू परब यांच्यासह पं.स. सभापती रवींद्र मडगावकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, संदीप कुडतरकर, महिला तालुकाध्यक्षा सौ. गीता परब, शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, न.प.गटनेते राजू बेग यांच्यासह सर्व महिला व पुरुष पदाधिकार्‍यांना पोलिस व्हॅनमध्ये कोंबून सावंतवाडी पोलीस स्थानकात आणण्यात आले. 

या प्रकरणात सावंतवाडी पोलिसांनी मुंबई कायदा कलम 68,69 अन्वये संजू परब यांच्यासह 41 स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दोन तासानंतर सोडून देण्यात आले. ही कारवाई सावंतवाडी पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश जाधव, पोहेकाँ. संजय हुंबे, महिला पोलीस माया पवार, देवानंद माने, वराडकर आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.