Sat, Jul 20, 2019 15:43होमपेज › Konkan › ...अन् तुफानात भरकटलेल्या बोटीला पोलिसांनी वाचविले

...अन् तुफानात भरकटलेल्या बोटीला पोलिसांनी वाचविले

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 10:46PMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

बंगालच्या उपसागरात गुरूवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे याचा फटका सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीलाही बसला. गुरूवारी मालवण-मेढा येथील विशाल ओटवणेकर यांच्या मालकीची गॉडगिफ्ट ही फायबर नौका तांडेल शेखर तोडणकर हे मालवण ते गोवा अशी घेऊन जात असताना सागरी हवामान अचानक खराब झाल्याने ही नौका वेंगुर्ले समुद्रात 3 ते 4 नॉटीकल मैलअंतरावर भरकटली. या घटनेची माहिती नौका मालक विशाल ओटवणेकर यांनी जिल्हा पोलिस यंत्रणेला दिली. याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी तत्काळ वेंगुर्ले समुद्र किनार्‍यावर बचाव पथक पाठविले. या पथकाने भरकटलेल्या नौकेला व त्यावरील तांडेलाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळविले. 

गुरूवारी विशाल ओटवणेकर यांची गॉडगिफ्ट ही फायबर नौैका घेऊन तांडेल शेखर तोडणकर हे सकाळी 7 वा. मालवण येथून रवाना झाले होते. ही नौका वेंगुर्ले समुद्रात पोहचल्यानंतर दु. 2 वा. च्या सुमारास सागरी हवामान अचानक खराब झाल्याने मोठ मोठ्या लाटा सुरू झाल्या. यातच नौकेचे इंजिन बंद पडले व नौकेमध्ये समुद्राच्या लाटांचे पाणी येऊ लागले. या घटनेची माहिती विशाल ओटवणेकर यांनी वेंगुर्ले ऑपरेशन रूम येथे दिल्यानंतर नौका व नौकेवरील तांडेलाच्या शोध व बचाव मोेहिमेसाठी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी दुपारी 4 वा. सहा. पो. नि.श्री. जाधव, पोलिस उपनिरीक्षक श्री. साळुंखे, श्री. धुरत, पोलिस नाईक श्री. मिठबावकर, श्री. गुरव, श्री. कोयंडे, इंजिन ड्रायव्हर श्री. ताम्हणकर, श्री. रेडकर, श्री. रोहिलकर, तांडेल जोशी असे पोलिस कर्मचारी व खलाशी, स्पीडनौका अस्मिता व संजीवनी ट्रॉलरने वेंगुर्ले बंदरात दाखल झाल्या. नौका मालकाने दिलेल्या माहितीनुसार गॉडगिफ्ट ही नौका मठ-मोचेमाड वेंगुर्ला समुद्रात सुमारे 4 ते 5 नॉटीकल मैल अंतरावर भरकटत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आपली स्पीडनौका तात्काळ भरकटलेल्या गॉडगिफ्टजवळ घेऊन जात नौकेमधील तांडेल शेखर तोडणकर यांना सुरक्षितरित्या आपल्या नौकेमध्ये घेतले. 

हवामान खराब असल्यामुळे गॉडगिफ्ट नौकेला बाहेर काढणे शक्य न झाल्याने त्या नौकेला त्याच ठिकाणी सुरक्षितरित्या नांगरून ठेवली व अस्मिता स्पीड नौका व संजीवनी ट्रॉलर सुखरूपरित्या वेंगुर्ले बंदरावर आणण्यात यश मिळविले. पोलिसांच्या या मोहिमेचे कौतुक होत आहे. 

 

Tags : sindhudurg, missing boat, police, Police saved,