Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Konkan › दहशत माजविणार्‍यांची पोलिसांकडून पाठराखण

दहशत माजविणार्‍यांची पोलिसांकडून पाठराखण

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:36PMचिपळूण : शहर वार्ताहर

जलतरण तलावातील मृत झालेल्या युवकाच्या घटनेचा सेनेने बाजार मांडला असून न.प.त त्याचा मृतदेह आणणार्‍यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी पत्रकार परिषदेत केली. गुंडगिरी व दहशत माजविणार्‍या सेनेतील राजकारण्यांना चिपळूणचे पोलिस पाठीशी घालत आहेत, अशा आरोप त्यांनी यावेळी केला.

या संदर्भात खेराडे यांनी सांगितले की, झालेल्या दुर्दैवी घटनेचे सेनेकडून राजकीय भांडवल सुरू आहे. आमचे कथित विरोधक जी राजकीय गिधाडे आहेत यातील काहीजणांनी वातावरण तणावपूर्ण बनविले. दु:खात असलेल्या युवकाच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्याऐवजी मृतदेहाची हेळसांड केली. असे असतानादेखील पोलिसांकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. या दुर्दैवी घटनेला आम्ही जे जबाबदार आहेत त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांच्या विरोधात योग्य त्या कारवाईसाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र, दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबियांना धीर देण्याचे बौद्धिक व नैतिक कुवत नसलेल्यांनी संधी घेत आगीत तेल ओतून जमावाला भडकावण्याचे काम केले.

हा सारा प्रकार पोलिस अधिकार्‍यांसमोर घडत होता. याहीपूर्वी विरोधकांनी चिपळूण न.प.तील कर्मचार्‍यांना वेठीस धरले होते. एका कर्मचारी, अधिकार्‍याला कोंडून ठेवण्याचा प्रकार केला होता. तसेच आपल्यालादेखील कोंडून ठेवण्यात आले होते. याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. मात्र, दखल घेण्याचे सहकार्यही पोलिसांनी दाखविले नाही. तसेच शहरातील अतिक्रमण हटविण्याच्यावेळी विरोधक व सेनेच्या दबावामुळे पोलिस बंदोबस्त दिला नाही. अशाप्रकारे चिपळूण पोलिसांकडून आमच्यावर अन्याय होत आहे. याविरोधात आता योग्य ठिकाणी दाद मागणार आहे. ज्या घटनेशी माझा थेट संबंध नाही. मी प्रशासकीय बांधील नाही. तरीही पोलिसांनी मला जबाबदार कसे धरले? असा सवाल खेराडे यांनी उपस्थित केला आहे. 

सेनेचे नगरसेवक अकार्यक्षम

मुख्याधिकार्‍यांना वाचविण्याचे काम शिवसेनेतील वरिष्ठ नेते करीत असून त्यांना मुदतवाढ देण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केला. मागील सभागृहात देवळेकर हे नगरसेवक म्हणून ठेकेदारीचीच कामे करीत होते व मुख्याधिकार्‍यांना तेच मॅनेज करीत होते. त्यांची दुकानदारी थांबल्यामुळेच आता ते सुडाचे राजकारण करीत आहेत. शिवसेनेचे बारा नगरसेवकही अकार्यक्षम असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यापुढे पालिकेत फुकट्या फेर्‍या मारणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रवेशद्वारांवर नोंदणी कक्ष निर्माण करणार. तसेच कामाशिवाय कुणालाही न.प.त प्रवेश दिला जाणार नाही.