Mon, Mar 25, 2019 13:16होमपेज › Konkan › अफवा पसरवणार्‍यांवर पोलिसांचा वॉच

अफवा पसरवणार्‍यांवर पोलिसांचा वॉच

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 11:19PMरत्नागिरी ः अनिकेत पावसकर

धुळे येथे मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून सोलापूरमधील 5 जणांना ग्रामस्थांनी अक्षरशः ठेचून मारले. या  घटनेनंतर सोशल मीडियावरून रत्नागिरीत अशा अफवा पसरू नयेत, यासाठी पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर हल्ली काही अनोळखी व्यक्तींचे आणि महिलांचे फोटो टाकून या व्यक्ती लहान मुले चोरणारी टोळी असल्याची अफवा पसरवली जात आहे. त्यामुळे समाजातील लोकांमध्ये संशयाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे परगावाहून आलेल्या आणि ज्या लोकांचा या गोष्टींशी काडीमात्र ही संबंध नसला तरी त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. तसेच त्यांची पूर्ण चौकशी न करताच केवळ संशय म्हणून त्यांना मारहाण करून कायदा हातात घेतला जातो. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने तसेच वर्मी घाव लागल्याने काहींचा मृत्यूही होतो. त्यामुळे हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा व दखलपात्र गुन्हा असल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर अशा अफवा प्रसारित करू नयेत. 

असे अफवांचे मेसेज प्रसारित करणार्‍या व्यक्तीवर रत्नागिरी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तसेच चुकीचे मेसेज प्रसारित करणार्‍या व्यक्तीवर रत्नागिरी पोलिस दलामार्फत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अपर पोलिस निरीक्षक मितेश घट्टे यांनी दिला आहे. 

काही महिन्यांपूर्वी फासे पारधी रत्नागिरीत आले असून त्यांच्याकडून घरफोड्या केल्या जात आहेत, अशा अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात होत्या. तसेच हाफ पॅन्ट गँग रत्नगिरीत सक्रिय असून त्यांच्याकडूनही रत्नागिरीत घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याच्या अफवा  व्हायरल होत होत्या. फासेपारधी आणि हाफ पॅन्ट गँग रत्नागिरीत आल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक रात्रीचे झोपताना घाबरत होते. सावधानता म्हणून रात्री गावांमध्ये चार-पाच जणांचे गट करून हातांमध्ये काठ्या आणि बॅटर्‍या घेऊन तरूण ठिकठिकाणी फिरून खडा पहारा देत होते. परंतु, पोलिसांनी रत्नागिरीत तसेच आजुबाजूच्या गावांत फासेपारधी तसेच हाफपॅन्ट गँग असे कोणीही आलेले नसून या सर्व अफवा असल्याचे सांगितले.

तसेच या कालावधी ज्या घरफोड्या झाल्या त्या सराईत चोरट्यांकरून करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. फासेपारधी आणि हाफ पॅन्ट गँगच्या अफवा असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आणि मोठा अनर्थ टळला होता.आता पुन्हा अशा अफवांनी डोके वर काढले आहे. शहरांमध्ये मुले पळवणारी टोळी असल्याची अफवा विकृत मनोवृत्तींच्या लोकांकडून पसरवल्या जात आहे. यामुळे पुन्हा घबराट पसरली आहे. अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.