Fri, Jul 19, 2019 07:31होमपेज › Konkan › पोलिस, एसटी कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

पोलिस, एसटी कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 8:14PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

राज्यस्तरावर 1 ते 31 डिसेंबर या कालावधीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मौखिक स्वास्थ तपासणी मोहीम कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्गातील पोलिस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कुडाळ व मालवण एसटी आगार आदी ठिकाणी मुख्य स्वास्थ तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत 90 पोलिस अधिकारी व कर्मचारी, 113 एसटी कर्मचारी व 70 महसूल कर्मचार्‍यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. 

जिल्हा रुग्णालयातील दंत शल्यचिकित्सक व एनटीसीपीचे जिल्हा सल्लागार डॉ. पौर्णिमा बिद्रे, दंत शल्यचिकित्सक  डॉ. शौनक पाटील, समुपदेशक आनंद परब,सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. 

राज्यातील कर्करोगाचे वाढते  प्रमाण लक्षात घेऊन मुख स्वास्थाबद्दल समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने 1 ते 31 डिसेंबर हा कालावधी मुख स्वास्थ तपासणी मोहिम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधिकार्‍यांनी एकत्रितपणे जिल्ह्यात ही मोहीम राबवावी,असे आदेश देण्यात आले होते.या अंतर्गत जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आली.

जिल्हा रूग्णालयातर्फे पोलिस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पोलिस कवायत मैदानावर मुख स्वास्थ तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यात 90 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली तर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महसूलच्या 70 कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. राज्य परिवहन मंडळाच्या कुडाळ आगारातील 56 व मालवण आगारातील 57 कर्मचार्‍यांची मौखिक तपासणी यावेळी करण्यात आली.