Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Konkan › कुडाळातील क्रीडांगण हस्तांतरण अडकले प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत!

कुडाळातील क्रीडांगण हस्तांतरण अडकले प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत!

Published On: Jan 24 2018 11:11PM | Last Updated: Jan 24 2018 10:25PMकुडाळ : वार्ताहर

कुडाळ तहसील कार्यालय नजीकच्या जागेत प्रस्तावित प्रशस्त क्रीडांगणाचा  विषय पुन्हा एकदा रेंगाळला आहे. गेल्या वर्षभरात यासंदर्भात तीन ते चार बैठका घेण्यात आल्या. यादरम्यान जमिनीचा ताबा घेण्यासाठी कुडाळ महसूल विभागाने विनंती करूनही दोनवेळा जिल्हा क्रीडा विभागाचे अधिकारी नियोजित क्रीडांगणाच्या  जागेच्या ठिकाणी फिरकलेच नाहीत. त्यामुळे प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत हा क्रीडांगणाचा विषय गेली कित्येक वर्षे अडकला आहे.

कुडाळ तहसील कार्यालयाच्या मागील भागात सर्व सोयींनी युक्‍त असे क्रीडांगण व्हावे यासाठी शासनाने सुमारे 1 कोटी रू. निधी मंजूर केला होता. निधी मंजूर करून सात ते आठ वर्षे उलटल्यानंतर  गतवर्षी या विषयाला गती देण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी जिल्हा क्रीडा विभागाचे अधिकारी, महसूल प्रशासन कोल्हापूर येथील आर्किटेक्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तहसीलदारांच्या दालनात तीन ते चार बैठकाही घेतल्या. यावेळी क्रीडांगणासाठी शासनाने  मंजूर केलेला निधी अपुरा पडत असल्याने सपाटीकरण व इतर प्राथमिक टप्प्यातील कामांसाठी जिल्हा नियोजनमधून 20 लाख रू. मंजूर करण्याबाबत चर्चाही झाली होती. यानंतर कुडाळ महसूल विभागाने या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देण्यासाठी जिल्हा क्रीडा विभागाला जागेवर बोलवले होते.

मात्र, या विभागाचे अधिकारी अथवा कर्मचारी याठिकाणी फिरकलेच नाही. त्यामुळे क्रीडांगणाचा प्रश्‍न प्रलंबित राहिला आहे. याशिवाय जागेतील झाडे तोडणीसाठी वनविभागाची परवानगी व इतर  अनेक कामांना अद्याप म्हणावी तशी गती मिळाली नाही. या क्रीडांगणाच्या विषयात आता  जिल्हा क्रीडाधिकारी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, याला या विभागाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

प्रस्तावित  क्रीडांगण  झाल्यास तालुक्यातील खेळाडूंना सराव करण्यास एक चांगले मैदान उपलब्ध होणार आहे. यातून दर्जेदार  खेळाडूही निर्माण होणार आहे.
 या क्रीडांगणात धावपट्टी, विविध प्रकारच्या खेळांसाठी सराव मैदानांचा समावेश आहे. मात्र, क्रीडांगणाच्या प्राथमिक टप्प्यातील कामांनाच अद्याप गती मिळाली नसल्याने तालुक्यातील क्रीडांगणाचे खेळाडूंचे स्वप्न  अद्याप अपुरेच राहिले आहे. याबाबत जिल्हा क्रीडाअधिकारी श्री. बोर्डवेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला 
नाही.