Tue, Sep 25, 2018 04:38होमपेज › Konkan › प्लास्टिक बंदीमुळे रद्दीचा भाव वधारला!

प्लास्टिक बंदीमुळे रद्दीचा भाव वधारला!

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 9:01PMओरोस : संजय वालावलकर

पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सध्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी लागू झाली आहे.या प्लास्टीक बंदीमुळे सध्या रद्दीचा भाव वधारला असला तरी विविध क्षेत्रातील व्यावसायिक व्यापार्‍यांना प्लास्टीक बंदीचा फटका बसू लागला आहे. फळे,भाजीपाला विक्रेत्यांचीही यामुळे अडचण झाली आहे. 

प्लास्टिक बंदी लागू करताना प्लास्टिकचा साठा नष्ट करण्यासाठी शासनाने दुकानदार आणि व्यापार्‍यांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे. शासनाच्या प्लास्टिक बंदीमुळे व्यापारी व्यावसायिक भाजी, फळ विक्रेत्यांनी दंडात्मक कारवाईमुळे होणार्‍या नुकसानीच्या भीतीपोटी पिशव्या ठेवणेच बंद केले आहे. पिशवी नसल्याने हात हलवत आलेला गिर्‍हाईक वस्तू घेण्याआधीच परतू लागल्याने त्याचा परिणाम मालविक्रीवर झाला आहे.

प्लास्टिक बंदीमुळे रद्दीचा भावही वाढत असून रस्त्या शेजारील टपरीवर मिळणारा समोसा, वडापाव असो वा भेळ कागदातच गुंडाळून दिल्यानंतर प्लास्टिक पिशवीतून पार्सल दिले जायचे. त्यावरही आता बंदी आल्याने छोट्या व्यावसायिकांची अडचण निर्माण झाली आहे. प्लास्टिक पिशवी नाही तर एखादी कापडी पिशवी असेल तरच भेळ, समोसा, वडापाव पार्सल घ्या नाही पेक्षा इथेच खा असे म्हणण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय उरलेला नाही. तर ग्राहकांनाही प्लास्टिक पिशवीवर आलेली बंदी अजून अंगवळणी पडली नसल्याने दोन-चार रुपये जास्त घ्या पण पिशवी द्या असे म्हणण्याची वेळ गिर्‍हाईकांवर आली आहे. 

सध्या कागदी रद्दीचा भाव वाढला असून  10 रु.. किलो दराने रद्दी घेतली जात आहे.हॉटेल,खाद्यपदार्थ विक्रेते, भाजीपाला, फळविक्रेते ग्राहकांना कापडी पिशवी आणा अशी जनजागृती करताना  दिसत आहेत. काही विक्रेत्यांनी कापडी पिशव्या उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.