Sun, Apr 21, 2019 06:14होमपेज › Konkan › भाई वैद्य यांच्या अस्थींचे गोपुरीत वृक्षारोपणाने विसर्जन

भाई वैद्य यांच्या अस्थींचे गोपुरीत वृक्षारोपणाने विसर्जन

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 9:44PMकणकवली:वार्ताहर    

भाई वैद्य समाजासाठी चंदनापरी झिजले त्यामुळे त्यांच्या अस्तींचे चंदनाचे झाड लावून गोपुरी आश्रमात विसर्जन करण्यात आले. हे चंदनाचे झाड भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी गोपुरी आश्रमातून प्रेरणा देत राहील. माझे वडील आयुष्यभर संस्कार आणि तत्वनिष्ठ जीवन जगले त्यांच्या अस्ती आजच्या स्थितीत तत्त्वनिष्ठा अबाधित ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी काम करणार्‍या गोपुरी आश्रमात चंदनाच्या वृक्षाचे रोपण करून त्याच्या मुळात विसर्जन करण्यात आले ही आम्हा वैद्य कुटुबियाना समाधान देणारी बाब आहे.आमच्या बाबांच्या स्मृती यामुळे अबाधित राहाणार असून भावी पिढी घडविण्यासाठी प्रेरणा देत राहणार आहेत,असे प्रतिपादन भाई वैद्य यांच्या कन्या प्राची वैद्य यांनी गोपुरी आश्रमात केले. 

महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री व ज्येष्ठ समाजवादी भाई वैद्य यांच्या अस्ती  रविवारी गोपुरी आश्रमात विसर्जीत करण्यात आल्या. जेष्ठ गांधीवादी विचारवंत जयवंत मटकर, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कमलताई परुळेकर, अ‍ॅड.सतोष मस्के, भाईंच्या स्नूषा मनिषा वैद्य,चंद्रकांत निवंगुरे,वर्षा ताई, ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर, संचालक अर्पिता मुंबरकर, सचिव मंगेश नेवगे, अशोक येजरे, बापू नेरूरकर आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत जयवंत मटकर यांनी भाई वैद्य यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.भाईंनी मंत्री असतानाही तत्त्वनिष्ठा सोडली नाही. तळागाळातील मुलांना केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळायला हवे यासाठी ते आयुष्याच्या अंतापर्यंत संघर्ष करत राहीले. राष्ट्रसेवादल हा त्यांच्या जीवनाचा प्राण होता. युवा वर्गात संस्कारक्षमता आली तरच देश बलवान होतो यावर त्यांची निष्ठा होती.

 भाईंचे स्नेही बापू नेरूरकर यांनीही त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांनीही भाईंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. भाईंच्या स्नुषा मनिषा वैद्य यांनी भाईंनी आपल्याला आईवडिलांचे प्रेम दिले असे सांगितले.  कमलताई परुळेकर यांनी भाई वैद्य यांनी आपले जीवन समाजासाठी वाहिले होते.त्यांचा आदर्श आजच्या पिढीला समजावून देण्याची गरज आहे.आज आपण भाईंच्या स्मृती त्यांच्या अस्थी चंदनाच्या झाडाच्या मुळात विसर्जन करून भावी पिढीला नवा आदर्श दिला हे प्रशंसनिय आहे. 

पुणे येथील अ‍ॅड.सतोष मस्के यांनी भाईंच्या कार्याचा आढावा घेतला.  अशोक येजरे,वर्षाताई यांनीही विचार मांडले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंत मटकर यांनी,तर स्वागत व आभार डॉ.राजेद्र मुंबरकर यांनी मानले.