Fri, Apr 26, 2019 03:21होमपेज › Konkan › पिंगुळीत विद्यार्थी वर्गाऐवजी पायरीवर!

पिंगुळीत विद्यार्थी वर्गाऐवजी पायरीवर!

Published On: Jan 23 2018 10:24PM | Last Updated: Jan 23 2018 9:40PMकुडाळ : शहर वार्ताहर

जि.प.प्राथमिक शाळा पिंगुळी आसनाचे पाणी या प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका वारंवार शाळेत उशिराने येत असतात, अशी तक्रार करत त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी करत मंगळवारी शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी  मुलांना शाळेच्या पायरीवर बसवून शाळा बंद आंदोल सुरू केले. पालकांनी शाळा उघडण्यासही विरोध करीत मुलांना घरी पाठविले.

इ. 1 ते 4 थी पर्यंत या शाळेत आठ विद्यार्थी पटसंख्या असून दोन शिक्षिका  कार्यरत आहेत. एका शिक्षिकेकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार आहे.  केंद्रप्रमुख यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतही याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने शाळा बंद आंदोलनाचा पर्याय निवडला असल्याचे पालकांनी सांगितले.तंटामुक्‍ती समिती अध्यक्ष विकास कुडाळकर यांना पालकांनी कल्पना दिल्यानंतर शाळेला भेट देवून केंद्रप्रमुख  श्री. मराठे  यांच्याशी चर्चा केली. मराठे यांनी आंदोलन स्थळी जावून  पालकांशी चर्चा केली, मात्र पालकांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच राहिले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. राजश्री काळप, ग्रा.पं. सदस्या सौ. प्रिया पांचाळ, बाबल सडवेलकर, गणपत गवळी, संजय परब, मयूर पिंगुळकर, पप्पू सडवेलकर, राजा पिंगुळकर, रवि गवळी, कौस्तुभ गवस, श्री. माडये आदींसह पालक उपस्थित होते.