Fri, Jul 19, 2019 20:44होमपेज › Konkan › रत्नागिरीतील पर्ससीननेट मच्छीमार होतोय सावध

रत्नागिरीतील पर्ससीननेट मच्छीमार होतोय सावध

Published On: Mar 08 2018 10:35PM | Last Updated: Mar 08 2018 9:57PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

पर्ससीननेट मासेमारीवर लादलेली बंधने, त्यानुसार होणारी कारवाई, त्याचवेळी परप्रांतीय बोटींना अभय अशा समस्यांच्या चक्रात सापडलेले स्थानिक बोट मालक हा मासेमारीचा व्यवसायच बंद करण्याचा विचार करू लागले आहेत. रत्नागिरी विभागातील बोट मालकांच्या या संदर्भात बैठका होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे अर्थकारणच अडचणीत सापडल्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर हे मोठे बंदर म्हणून ओळखले जाते. या रत्नागिरी विभागात सुमारे 280 पर्ससीननेट पद्धतीने मासेमारी करणार्‍या बोटी असून प्रत्येक बोटीमागे सव्वा कोटी रूपयांची गुंतवणूक आहे. 5 फेब्रुवारी 2016 रोजी अधिसूचना जारी होण्यापूर्वी आठ महिने मासेमारी करण्याची परवानगी होती.

अधिसूचनेनंतर चार महिने कमी होऊन अवघे चार महिने मासेमारी करण्याची वेळ आली. त्याचवेळी एलईडी प्रकाशातील मासेमारी कायदेशीर होती त्यावरही आता बंदी आली आहे.बंदीकाळातील कारवाई प्रामुख्याने रत्नागिरीतच होऊ लागली. त्यामुळे बोट मालकांमध्ये आणखी धास्ती निर्माण झाली. कोट्यवधीची गुंतवणूक चार महिन्यांच्या मासेमारीत कशी वसूल होणार? ही भीती निर्माण झाल्याने देशोधडीला लागण्यापूर्वीच या उद्योगातून परावृत्त होण्याची इच्छा व्यक्त होऊ लागली. ही भूमिका प्रत्येक बोट मालक एकमेकांकडे मांडू लागला आणि त्यावर चर्चा करण्यासाठी गेल्या बुधवारपासून चर्चा होऊ लागल्या आहेत. या उद्योगातून कायमस्वरूपी कसे बाहेर पडावे यावर खलबते होऊ लागली आहेत. रत्नागिरी विभागातील पर्ससीन नेट मासेमारीवर जिल्ह्याचे मोठे अर्थकारण अवलंबून आहे. 25 ते 50 टन उत्पादन क्षमता असलेले 25 बर्फ कारखाने कार्यरत आहेत. प्रत्येक कारखान्याची गुंतवणूक 50 लाख ते 1 कोटीपर्यंत असून प्रत्येक बर्फ कारखान्यात 10 ते 20 जणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. याच व्यवसायावर चार फिश मिल्स कार्यरत असून ही गुंतवणूक 20 ते 25 कोटी रूपयांची आहे. यातून सुमारे 400 ते 500 कामगारांची रोजीरोटी अवलंबून आहे. मच्छी व्यवसायावर आधारित सुमारे 15 कटिंग शेड्स कार्यरत असून यावर सुमारे 1 हजार महिलांची कुटुंबे अवलंबून  आहेत. याच व्यवसायातून शासनाला कोट्यवधीचे परकीय चलन मिळत असून अनेक पूरक व्यवसाय याच मच्छी व्यवसायावर अवलंबून आहेत. अशा प्रकारे सुमारे 8 ते 10 हजार जणांच्या उपजीविकेचे साधनच धोक्यात आले आहे.