Wed, Apr 24, 2019 20:11होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : ‘52 गावांत वृक्षतोडीस हिरवा कंदील

सिंधुदुर्ग : ‘52 गावांत वृक्षतोडीस हिरवा कंदील

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:01PMसावंतवाडी ः प्रतिनिधी

न्यायालयाच्या  याचिकेतून वगळण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील 52 गावांमध्येे वृक्षतोड करण्यास वनविभागाने हिरवा कंदील दिला आहे. दोन्ही तालुक्यांतील 25 गावे वगळून खासगी मालकी क्षेत्रात वृक्षतोड करण्यास उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी परवानगी दिली. तसेच सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांचा तक्रार अर्ज चौकशीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर श्री विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेतर्फे पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व लाकूड व्यावसायिक संघटनेने मंगेश तळवणेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. 

25 गावे सोडून इतर ठिकाणी वृक्ष अधिकारी यांच्यामार्फत परवानगी घेऊन वृक्षतोड चालू असल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शपथपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये खासगी क्षेत्रातील वृक्षतोडीस परवानगी देण्यात येईल. तसेच तपासणीच्या नावाखाली शेतकर्‍यांना त्रास देत असल्याचा आरोप असलेले सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. लाकूड तपासणीच्या नावाखाली अधिकारी त्रास देत आहेत, परवान्यासाठी व्यावसायिक आणि शेतकर्‍यांची पिळवणूक केली जात आहे. वेळेत काम पूर्ण करून दिले जात नाही. तपासणीच्या नावाखाली चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो, ही चुकीची प्रक्रिया बंद करण्यात यावी तसेच व्यावसायिकांसह शेतकर्‍यांना सहकार्य करावे, उगाच कायद्याचा बाऊ करू नये, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

तालुक्याच्या ठिकाणी काम करणार्‍या वनमजुरांना बदलण्यात यावे. सहहिस्सेदारांच्या सम्मतीशिवाय परवानगी मिळत नाही. त्यामुळे हमीपत्रावर भरपाई देण्यात यावी, गाडी तपासल्यानंतर खासगी किंवा सरकारी जंगलातील माल आहे. याची चौकशी झाल्यानंतर लाकूड वाहतूक करणारी गाडी सोडून द्यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.  आंदोलकांनी मांडलेल्या तेरा ही मागण्या आपण मान्य केल्याचे  चव्हाण यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून होणार्‍या नुकसानीबाबत समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकरी संघटनेकडून प्राप्त निवेदनातील नमूद मागणी त्यामध्ये समाविष्ट करून तसा अहवाल पाठविण्यात येईल, शेतकर्‍यांना अपमानास्पद वागणूक मिळणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, शेतकर्‍यांचा उत्पादित माल कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांच्या निर्देशित कालावधीत निर्गत न झाल्यास वनक्षेत्रपाल 

कार्यालय स्तरावर पुढील माल निर्गत होण्यापर्यंत वनक्षेत्रपाल यांचे स्तरावरुन परवानगी देण्यात येईल, वनमजूर नार्वेकर, कर्पे, प्रकाश गवस, साळकर यांची बदलीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, शेतकर्‍यांनी वृक्षतोडीची परवानगी घेऊन वृक्षतोड केल्यानंतर सात दिवसांचे आत मोका तपासणी करुन वरिष्ठ कार्यालयास सदरचे मालकी प्रकरण पाठविण्याबाबत आदेश देण्यात येतील, विनापरवाना वनोपजाची वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनाची प्राथमिक तपासणी आवश्यक ते कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी तत्काळ करण्याचे आदेश देण्यात येतील.  असे लेखी  पत्र उपवनसंरक्षक यांनी श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेला देत धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. 

आनंद गवस, महादेव बोर्डेकर, सतीश साळगावकर, दयानंद धाऊसकर, शिवाजी गवस, शकिल शेख, राजन गावडे, विठ्ठल दळवी, प्रकाश देसाई यांच्यासह शेकडो शेतकरी व लाकूड व्यावसायिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.