Mon, Mar 25, 2019 17:30होमपेज › Konkan › पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही

पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही

Published On: May 07 2018 11:39PM | Last Updated: May 07 2018 11:26PMकणकवली : प्रतिनिधी

गेली 18 वर्षे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ‘जैसे थे’ ठेवून पाटबंधारे विभागाने धरणाचे 60 टक्के काम पूर्ण केले आहे. आता मात्र आम्ही कोणत्याही आश्‍वासनाला बळी पडणार नाही. जोपर्यंत प्रकल्पातील शेवटच्या कुटुंबाचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत काम करू देणार नाही, असा इशारा नरडवे प्रकल्पग्रस्तांनी प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला दिला. यावेळी धरणग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी धरणग्रस्तांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; मात्र धरणग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 

नरडवे धरणग्रस्त विकास समन्वय समिती (मुंबई) यांनी सोमवारी धरण बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.  त्यानुसार प्रकल्पग्रस्त सोमवारी सकाळी 11 वा. प्रभाकर ढवळ यांच्या घरी एकत्र जमून धरणाच्या बंधार्‍यापर्यंत घोषणाबाजी करत पोहोचले. तेथे सभेत रूपांतर झाले. यावेळी पाटबंधारे विभागाचे  उपअभियंता प्रमोद रणखांबे, सहायक कार्यकारी अभियंता आशिष चौगुले, अभियंता विशाल सावंत, प्रकाश परीट, स्वप्निल आजगावकर आदी उपस्थित होते. 

धरणग्रस्त विकास समन्वय समितीचे सुरेश ढवळ, संतोष सावंत, प्रभाकर ढवळ यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांसमोर मांडल्या. गेली 18 वर्षे आमचे जीवन दोलायमान झाले आहे. आजपर्यंत धरणग्रस्तांना योग्य मोबदला मिळाला नाही, तसेच त्यांचे पुनर्वसनही झालेले नाही. आमचा धरणाला मुळीच विरोध नाही. विकासालाही आमचा विरोध नाही, पण आम्हा धरणग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व शेतीला काळानुरूप भाव द्यावा, हीच आमची मागणी आहे. आमचा कुणावरही रोष नाही. धरणग्रस्तांच्या प्रश्‍नाकडे शासनाने दुर्लक्षच केले आहे. खरे तर, आधी पुनर्वसन मग धरण, असे शासनाचेच धोरण आहे. असे असताना शासनानेच त्याला हरताळ फासला आहे.  

यावेळी धरणग्रस्तांच्या मागण्या समन्वय समिती पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांसमोर मांडल्या. उपअभियंता प्रमोद रणखांबे यांच्यासह सहायक अभियंता आशिष चौगुले यांनी प्रशासनाची बाजू मांडत धरणग्रस्तांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. वनसंज्ञेतील बाधितांना नुकसानीची रक्‍कम दिली जाईल, स्वेच्छा पुनर्वसन, अतिरिक्‍त कुटुंबांची नोंदणी, गावठाणातील सर्व सुविधा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांनी आम्हाला काम करू द्यावे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका अधिकार्‍यांनी मांडली. मात्र, प्रकल्पग्रस्त आपल्या म्हणण्यावर ठाम होते. 

जोपर्यंत प्रकल्पात बाधित होणार्‍या शेवटच्या कुटुंबाचे पुनर्वसन होत नाही, तसेच इतर सर्व प्रश्‍न सोडविले जात नाहीत, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असे सांगत प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडले. यावेळी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धरणग्रस्तांनी यावेळी घोषणाबाजीही केली. 

Tags : Kankavali, Naravade, Dam, Project