Sat, Dec 07, 2019 15:20होमपेज › Konkan › पेंडूर ग्रामसेवकाला लाच घेताना अटक

पेंडूर ग्रामसेवकाला लाच घेताना अटक

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:33PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी 

मालवण तालुक्यातील  कट्टा येथील खरारे-पेंडूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिनेश शिवराम चव्हाण (49 मु. साळिस्ते ता.कणकवली) यांना एक हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत (अँटीकरप्शन) च्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना  खरारे-पेंडूर ग्रामपंचायात कार्यालयात शनिवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, चव्हाण यांना अटक करून  त्यांची सखोल चौकशी उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर   रात्रौ कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तर रविवारी न्यायालयात त्यांना हजार करून पुढील कारवाई केली  जाणार आहे. 

वर्षभरापूर्वी ग्रामसेवक या पदावर नव्याने रुजू झालेल्या श्री. दिनेश चव्हाण त्यांचे काम चांगल्या प्रकारे सुरु होते. दोन दिवसांपूर्वी  येथील ग्रामस्थाला आपल्या जुन्या घराच्या बांधकामासाठी 1 लाख 15 हजार रुपये रक्कम एका कंपनीने मंजूर ही केली होती. दोन दिवसांपूर्वी त्या ग्रामस्थाने आपल्या घराच्या बांधणीसाठी घरपत्रकाचा उतारा मिळावा, अशी मागणी ग्रामसेवक यांच्या जवळ केली. यावेळी ग्रामसेवक चव्हाण यानी त्या ग्रामस्थाजवळ 5 हजार रुपयांची मागणी केली.

सुरुवातीला यातील 3 हजार रुपये त्या ग्रामस्थाने ग्रामसेवक चव्हाण यांना दिले होते. शनिवारी असिसमेंटचा उतारा आणण्यासाठी हे ग्रामस्थ ग्रामपंचायत खरारे- पेंडूर येथे गेले असता त्यांच्या जवळ उर्वरित 2 हजार रुपयाची मागणी ग्रामसेवक दिनेश चव्हाण यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेअंती 1 हजार रुपयाची रक्कम देण्याचा तोडगा निघाला.  याबाबत सर्व घडलेली हकिगत त्या ग्रामस्थाने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी शंकर चिंदरकर,  नितीश केणे व त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचला. यावेळी ग्रामसेवक दिनेश चव्हाण 1 हजार रुपायची लाच रुपी रक्कम स्वीकारताना रंगेहात लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. ही घटना समजताच कट्टा- पेंडूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ग्रामापांच्यात परिसरात एकच गर्दी केली होती.  

गेल्यावर्षीही ग्रामसेवकाला पकडले होते

गेल्या वर्षी येथील ग्रामसेवक अरुण जाधव यांना ही अशीच लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले होते.  त्यानंतर वर्षभरापूर्वी या ग्रामपंचायतीवर नव्याने ग्रामसेवक दिनेश चव्हाण यांची नियुक्ती  झाली होती. मात्र, या ग्रामसेवकालाही पुन्हा एकदा लाच घेताना पकडण्यात आल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू होती.