Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Konkan › हत्तींना रोखण्यासाठी शेतकर्‍यांना मधुमक्षिका पालन कीट

हत्तींना रोखण्यासाठी शेतकर्‍यांना मधुमक्षिका पालन कीट

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:28PMदोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित शेतकर्‍यांना आ. नितेश राणे यांनी मदतीचा हात पुढे केला. हत्तींना वस्ती आणि शेती बागायतीत येण्यापासून  रोखण्यासाठी आणि शेतकर्‍यांना रोजगार देण्यासाठी त्यानी हेवाळे, वीजघर, राणेवाडी, बांबर्डे इथल्या शेतकर्‍यांना मधुमक्षिका पालनासाठीच्या चौदा कीटचे वाटप केले. यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत त्यांनी हत्ती समस्येबाबत पालकमंत्री व खासदारांवर टीका केली. या लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे होते ते आम्ही केले, असा दावा आ. राणे यांनी केला. 

आ. राणे म्हणाले, शेती बागायतीचे नुकसान हत्तींमुळे झाल्याने शेतकरी उपोषणाला बसतात, भरपाईसाठी सरकारकडे हात पसरतात, त्या शेतकर्‍यांसाठी काही करण्याची राजकीय  इच्छाशक्ती खा. विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये नाही. ‘चांदा ते बांदा’ योजने अंतर्गत कोट्यवधी रुपये येतात.त्या पैशातून ते इथल्या शेतकर्‍यांना उभे करू शकले असते.पण त्यांनी ते केले नाही. उपोषणा दरम्यान त्यांचा प्रश्‍न  सोडविण्याचा मी शब्द दिला होता. त्यानुसार मी हत्तींना रोखण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या रोजगारासाठी मधुमक्षिका पालनाचा पायलट प्रोजेक्ट तालुक्यात राबवत आहोत. तो यशस्वी झाला तर तो राज्यातही राबवता येईल. ज्यामुळे शेती बागायतींचे हत्ती आणि वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान रोखता येईल .

मागच्या वीजघर दौर्‍यात अशा प्रकल्पाबद्दल माहिती असल्याचे वनाधिकार्‍यांनी  सांगितले होते. पण त्यानाही तसा प्रकल्प राबविण्याची इच्छा  नाही. एखादी खाजगी संस्था तसा प्रकल्प राबवू शकते तर शासकीय यंत्रणात ते काम का करत नाही? असा सवालही त्यानी केला.  स्वाभिमानचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष रमेश दळवी, राजू निंबाळकर, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, अंकुश जाधव, सूर्यकांत गवस, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मनीष दळवी अन्य कार्यकर्ते व शेतकरी  उपस्थित होते.