Fri, Apr 26, 2019 10:05होमपेज › Konkan › पावस विद्यामंदिरमध्ये बिन भिंतीची शाळा भरली...!

पावस विद्यामंदिरमध्ये बिन भिंतीची शाळा भरली...!

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 11:14PM

बुकमार्क करा
 

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी किंवा मार्गावर असलेल्या शाळा कशा समृद्ध होऊ शकतात, त्या शाळांमधील विद्यार्थी बाहेर पडल्यावर स्वत:सह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू शकतो हे पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर शाळेने ‘बिन भिंतीची उघडी शाळा’ उपक्रमाने दाखवून दिले. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे 20 स्टॉल उभारून एका दिवसात तब्बल 45 हजार रूपयांचा व्यवसाय केला. स्टॉलवरचे सर्व पदार्थ विद्यार्थ्यांनीच तयार केले होते. जिल्ह्यातील असा हा पहिलाच उपक्रम आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक शाळा विविध कारणांस्तव ओस पडत आहेत. त्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणार्‍या भौतिक सुविधा नसणे, अर्थार्जन करून देणारे शिक्षण किंवा प्रोत्साहन न मिळणे ही त्यातील महत्त्वाची कारणे आहेत. यावर आता स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर व डॉ. बी. आर. सामंत तथा दादासाहेब सामंत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तोडगा शोधून काढला आहे. संस्थाध्यक्ष, शालेय समिती अध्यक्ष व शिक्षक वर्गाच्या प्रोत्साहनामुळे हा तोडगा यशस्वीसुद्धा झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावस, गणपतीपुळे, वेळणेश्‍वर, पन्हाळेकाजी, थिबा पॅलेस, माचाळ ही ‘ब’ वर्गातील पर्यटनस्थळे आहेत. त्याचबरोबर गड, लेणी, धबधबे, मंदिरे, समुद्रकिनारे अशी 63 ‘क’ वर्गातील पर्यटनस्थळे आहेत. सुट्टीच्या मोसमात मोठ्या संख्येने पर्यटक या स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना अर्थार्जन कसे होऊ शकते, याला वाव देण्यासाठी संस्थाध्यक्ष भाई सामंत, काका सामंत, मुख्याध्यापक सुरेश कुलकर्णी, उपमुख्याध्यापक प्रिया गावडे, शालेय समिती अध्यक्ष संतोष सामंत, शिक्षकवर्गाचा विचारविनिमय सुरू झाला. त्यामध्ये शिक्षक आनंद शेलार यांनी ‘बिन भिंतीची शाळा आणि स्टॉल’ ही संकल्पना मांडली.

प्रकल्पाची संकल्पना पटल्यानंतर ती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर मांडण्यात आली. अगदी 100 टक्के मार्क मिळाले तरी जे शक्य होणार नाही तो उपक्रम राबवण्यासाठी सर्व संमती झाली. पालकांनी स्वत:हून पुढाकार घेत या उपक्रमाच्या शुभेच्छा फलकासाठी आर्थिक मदतीचा हात दिला. यातून खर्च सोडून शाळेला सुमारे 42 हजार रूपये मिळाले. ही मदत शाळा सुधारणा, भौतिक सुविधांसाठी वापरता येणार आहे. विद्यार्थ्यांचे गट करून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले गेले. पर्यटकांसह स्थानिकांचाही प्रतिसाद मिळून एका दिवसात 45 हजार रूपयांचा व्यवसाय 
झाला.
मैदानावर जत्रेप्रमाणे गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला वाव देणार्‍या कला रसस्वाद अंतर्गत रांगोळ्या, फ्लॉवर-सॅलड डेकोरेशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. डिसेंबरच्या 23 तारखेला हे मैदान जसे गर्दीने फुलले होते तसे फुल-फळांच्या कलाकृतींसह रांगोळ्यांनीही आकर्षक बनले होते. जिल्ह्यातल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची इतर शाळांनाच नव्हे तर समाजालाही गरज वाटू लागली आहे. ‘अनुदान नाही’ या कारणास्तव रडणार्‍यांना हा चांगला धडा या उपक्रमाने दिला.