Thu, May 23, 2019 05:14होमपेज › Konkan › खेड बसस्थानकात प्रवाशांचा हंगामा

खेड बसस्थानकात प्रवाशांचा हंगामा

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 11:00PMखेड : प्रतिनिधी

खेड बसस्थानकातून पावणे एकच्या सुमारास सुटणारी खेड-पोफळवणे गाडी दुपारचे दोन वाजून गेले तरीदेखील सोडण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी खेड बसस्थानकातील चौकशी कक्षच बंद केला. ही घटना दि.8 रोजी घडली. त्यामुळे बसस्थानकात एकच गोंधळ उडाला होता. 

खेड बसस्थानकातून सुटणारी पोफळवणे बस सलग दोन दिवस विलंबाने सुटणे अथवा रद्द होणे असा प्रकार सुरू होता. मंगळवार दि. 8 रोजी देखील या बसच्या संदर्भात असा प्रकार होत असल्याने प्रवासी संतप्त झाले. यावेळी ही बस रद्द करून पुढील आणसपुरे गाडी सोडण्याचा अट्टाहास बस स्थानकातील कर्मचार्‍यांनी केला. परंतु, पोफळवणे गाडी जोपर्यंत सोडत नाही. तोपर्यंत बस स्थानकातून एकही बस सोडू देणार नाही, असा पवित्रा पोफळवणे येथील ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर चौकशी कक्षात दुपारी एक वाजल्यापासून कंटाळलेल्या प्रवाशांनी अखेर चौकशी कक्षच बंद केला. 

दुपारच्या उन्हात वैतागलेल्या प्रवासीवर्गाला या ठिकाणी चौकशी करायला गेल्यानंतर तेथे असलेल्या स्थानिक अधिकारी व कर्मचार्‍यांनी उडवा-उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. जर तुम्हाला एखादी गाडी रद्द करायची आहे तर त्या गाडीच्या वेळेच्या आधी 

तासभर तरी आपण स्थानक परिसरात सूचना फलक लावा. आमच्या सोबत आमची वृद्ध मंडळी तसेच लहान मुले ताटकळत एस.टी.ची वाट पाहत असतात. तरी तुम्ही सूचना फलक लावून आम्हाला आधी कल्पना द्यावी, अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली. मात्र, जो पर्यंत पोफळवणे गाडी सोडत नाही तोपर्यंत चौकशी कक्षातून आम्ही हलणार नाही. तसेच एकही बस या ठिकाणाहून सुटणार नाही, असा पवित्रा प्रवाशांनी घेतला. त्यामुळे  काही काळ वातावरण तंग झाले होते. त्यानंतर खेड पोलिसांनी मध्यस्थी करीत पोफळवणेकडे जाणार्‍या गाडीची व्यवस्था करून दिली. यानंतर सर्वच गाड्या सुरळीत सुरू झाल्या.