Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Konkan › प्रवासी भाड्यात वाढ मात्र सेवेचा बोजवाराच!

प्रवासी भाड्यात वाढ मात्र सेवेचा बोजवाराच!

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 18 2018 8:53PMसावंतवाडी : अंजली घाडी

आर्थिक तोटा, कामगारांच्या वेतनवाढीचा करार आणि इंधन दरवाढीमुळे एस. टी. प्रशासनाने तिकिटदरात 18 टक्के भाडेवाढ केली. मात्र, दुसरीकडे प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्याकडे मात्र एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष कामय आहे.  बसेस उपलब्ध होत नाहीत. त्याचबरोबर गाड्या अचानक ब्रेकडाऊन होणे, गाड्यांना लाईट नाही तर कधी तिकिट मशिन चार्ज नाही अशी अनेक कारणे देत चक्क बसफेरी रद्द करण्यात येते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. 

कुडाळच्या दिशेने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी सावंतवाडी आगाराची सायंकाळी 7 नंतर एकही बस नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी कामावरुन सुटणार्‍या प्रवाशांना कुुडाळ, कणकवली डेपोच्या बससेवेवर अवलंबून रहावे लागते. मात्र, या डेपोच्या बसफेर्‍या अचानक रद्द करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. 

सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून शहरापर्यंत जोडणारी प्रवाशांना आपलीशी वाटणारी एस. टी. बससेवा ही एक सामाजिक बांधिलकी जोपासणारी सेवा आहे. सर्वसामान्यांचे दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून एस.टी. सेवेकडे पाहिले जाते. मात्र,  एस.टी. प्रशासन प्रवाशांचे हित जपते आहे का,  असा सवाल उपस्थित होतो. एस.टी. महामंडळाने आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी भाडेवाढीचा पर्याय स्विकारला आहे. डिझेल दरवाढीचे कारण देत तिकिट दरातही घसघशीत वाढ केली आहे. मात्र, प्रवाशांना चांगली सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवासी एस. टी.च्या कारभाराबाबत नाराज आहेत. साध्या गाड्यांबरोबर शिवनेरी, शिवशाहीच्या सेवाही महागल्या आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध सेवा उपलब्ध करुन देत असतानाच मूलभूत सुविधांकडेही तेवढेच लक्ष देण्याची गरज आहे. 

सावंतवाडी येथे कामधंद्यासाठी बरेच प्रवासी ये-जा करतात. सायंकाळच्या वेळी एस. टी. बसेस वेळेत सोडल्या जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. सायंकाळी 7 वाजल्यानंतर सावंतवाडी डेपोतून कुडाळच्या दिशेने एकही बस सोडली जात नाही. शटल सेवेनुसार एक-एक तासाने बसचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. सायंकाळी 7 ची सावंतवाडी - कुडाळ, 7.45 वा. पणजी-कुडाळ, 8. वा. सावंतवाडी-कणकवली त्यानंतर थेट 9.15 वा. कुडाळ - सावंतवाडी असे बसचे वेळापत्रक आहे. मात्र, 8 वा. सावंतवाडी येथून सुटणारी कणकवली डेपोची सावंतवाडी-कणकवली ही बस  बर्‍याचदा अचानक रद्द करण्यात येते. मागच्या आठवड्यात गुरुवारी ही बस ब्रेकडाऊन तर रविवारी गाडीला लाईट नसल्याचे कारण देत गाडी सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना दोन तास बसस्थानकात तिष्ठत थांबावे लागले. त्यानंतर प्रवाशांनी खासगी सेवेचा आधार घेतला.  काहीवेळा तिकिट मशिन चार्ज नसल्याचे कारण सांगून बस एक ते दीड तास उशिरा सोडण्यात येते. 

बर्‍याचदा कंडक्टर व वाहकांकडून प्रवाशांना चांगली वागणूक देण्यात येत नाही. चालकांच्या बेदरकारपणामुळे बर्‍याचदा प्रवाशांच्या जीवावर बेतते.  वृद्ध प्रवाशांना चढता उतरताना त्यामुळे त्रास होतो. मागील आठवड्यात आकेरी येथे देवगड आगाराच्या एका नवीन चालकाच्या बेजबाबदारीमुळे एक महिला एस.टी.खाली येतायेता वाचली. वाहकाशी याबाबत विचारणा केली असता चालक नवीन असल्याचे उत्तर देण्यात आले. काही बसथांब्यावर बस थांबविल्या जात नाहीत. अशा अनेक कारणांमुळे बससेवेला गालबोट लागत आहे. प्रवासी भाड्यात एस.टी. प्रशासनाने घसघशीत वाढ केली. मात्र, प्रवाशांच्या हिताकडे मात्र दुर्लक्षच केले आहे. एस.टी. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे उच्चवर्गीय प्रवाशांची एस.टी. बससेवेला पसंती नसते. त्यामुळे एस.टी. प्रशासनाचे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद कितपत खरे ठरते याबाबत शंका आहे.