Fri, Apr 26, 2019 17:18होमपेज › Konkan › परुळे प्रा. आ. केंद्रातील डॉक्टरवर सेवा समाप्तीची कारवाई!

परुळे प्रा. आ. केंद्रातील डॉक्टरवर सेवा समाप्तीची कारवाई!

Published On: Aug 10 2018 11:57PM | Last Updated: Aug 10 2018 11:36PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

परूळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.जगन्‍नाथ नागवेकर हे  रूग्णांशी बेजबाबदारपणे वागून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांच्या निष्क्रीयतेमुळे दोन रूग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप सदस्य सुनील म्हापणकर यांनी करत अशा डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सभागृहात केली.तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी डॉ.नागवेकर यांच्या विरोधात अनेक तक्रारी  प्राप्त झाल्या असून त्यांच्या सेवा समाप्तीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीला पाठवला असल्याचे स्पष्ट केले. मात्र अशा डॉक्टरला त्याची सेवा समाप्ती  करून न थांबता त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करावे अशी सूचना सतीश सावंत यांनी केली.

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली.  समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. टी. जगताप, उपाध्यक्ष रणजीत देसाई, विषय समिती सभापती प्रितेश राऊळ, सायली सावंत, सदस्य सतीश सावंत, संजय पडते आदींसह अधिकारी,खातेप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला शहीद मेजर कौस्तुभ रावराणे व दापोली  कृषी महाविद्यालयातील 30 कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
वेंगुर्ले तालुक्यातील परूळे प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नागवेकर रूग्णांना सुरळीत आरोग्य सेवा देत नाहीत, रूग्णांशी उद्धट वागतात.त्यांनी वैद्यकीय उपचारात हयगय केल्याने दोन रूग्णांचा बळी गेला आहे. त्याच बरोबर या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनाही विनाकारण त्रास देतात. या डॉक्टरांच्या विरोधात एकवटलेल्या परूळे पंचक्रोशीतील सरपंचांना देखील डॉ.नागवेकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. हे डॉक्टर खरोखरच एमबीबीएस आहेत का हेही तपासा. कारण ते बाजारात स्टॉल लावून गावठी औषधे विकतात.  अशा डॉक्टरवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सुनील म्हापणकर यांनी केली. या मागणीला सर्वच सदस्यांनी उचलून धरले. या मुद्यावर स्पष्टीकरण देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी डॉ.नागवेकर यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने त्यांच्या सेवा समाप्तीचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आला आहे.

....तर कोल्हापूरला सभा घ्यायची काय?
जिल्हा माध्यमिक विभागचे बरेच प्रश्‍न पेंडिंग आहेत. जिल्ह्यातील काही माध्यमिक विद्यालयांच्या कारभाराबाबतही बरेच प्रश्‍न शिक्षण उपसंचालकांकडे प्रलंबित आहेत. यासाठी शिक्षण उपसंचालकांना शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत बोलावण्यात आले होते. मात्र ते सभेस उपस्थित न राहिल्याने  सदस्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्‍त केली.  ते या ठिकाणी सभेस उपस्थित राहणार नसतील तर आम्ही ही सभा कोल्हापूरला घ्यायची का? असा संतप्त सवाल उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी केला. 

जिल्ह्यातील प्रलंबित सर्व विषयांची लवकरात लवकर सुनावणी घेऊन हे विषय संपवावेत अशा सूचना केल्या. या सर्व विषयांसाठी 21 ऑगस्ट रोजी संबंधित शाळांचे  संस्था चालक, मुख्याध्यापक आणि तक्रारदार यांची सभा आयोजित करून त्या सभेला उपसंचालकांनाही बोलाविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

महामार्गाच्या प्रश्‍नावर 14 रोजी बैठक
 महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना योग्य पद्धतीने होत नसल्याचा मुद्दा  सभागृहामध्ये उपस्थित झाला. विशेषतः महामार्गाच्या काँक्रीटीकरणावर टाकण्यात आलेल्या गोणपाट तसेच ठिकठिकाणी टाकलेली मोठमोठी लाकडे यामुळे डास निर्मिती होऊन लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर हे सर्व अपघातांनाही कारणीभूत होत आहे. यासह महामार्गाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या सभेत महामार्ग विभागाचे  अधिकारी बोलाविण्यात आले होते. मात्र ते नसल्याने अधिकार्‍यांच्या उपस्थितीत 14 ऑगस्ट रोजी अध्यक्षांच्या दालनात बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.

सावंतवाडी तालुक्यात नसबंदी करताना हलगर्जीपणा करणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी सदस्य दादा कुबल यांनी केली. त्यावर चर्चा होऊन जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष सौ रेशमा सावंत यांनी दिल्या.

सरकारी जागेवरील घरकुले नियमित करणार
सन 2010 पूर्वी शासकीय जागेवर घरकुले बांधलेली असतील आणि ग्रामपंचायत नमुना नंबर 8 ला नोंद असेल तर अशी घरकुले कायम करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.

साटेली- भेडशी, सांगली आणि फणसगाव प्रा. आ.  केंद्राची नवीन इमारत बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी यावेळी दिली.