Wed, Aug 21, 2019 14:54होमपेज › Konkan › ‘आरटीई’प्रवेशाला पालकांचाच अनुत्साह

‘आरटीई’प्रवेशाला पालकांचाच अनुत्साह

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 9:02PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शिक्षणहक्‍क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेला पालकांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात 90 शाळांमध्ये 935 जागा आरटीई प्रवेश प्रक्रियेतून भरण्यात येणार होत्या. मात्र, यासाठी केवळ 438 पालकांनीच आपल्या पाल्यांची नोंदणी केली आहे. त्यातून जिल्ह्याभरात 204 जागा भरण्यात आल्या आहेत.

आर्थिक चणचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार्‍या मागास प्रवर्गातील बालकांना चांगल्या शाळेत प्रवेश घेता यावा, यासाठी केंद्र सरकारने शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत 2012 साली आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के कोटा प्रवेश सुरू केले. बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित मान्यता असणार्‍या सर्व शाळांमध्ये एससी, एसटी, दिव्यांग मुले व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना 25 टक्के प्रवेश दिला जातो.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातही आरटीई प्रवेश प्रकियेसाठी पालकांना आवाहन करण्यात आले होते. मात्र, पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. प्रत्येक तालुक्यातील 10 शाळा याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात शाळांची नोंदणी आरटीई प्रवेशासाठी करण्यात आली होती. या शाळांमधून 935 विद्यार्थ्यांना राखीव कोट्यातून प्रवेश देण्यात येणार होता. यासाठी शासनाच्या आरटीई पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या नावाची ऑनलाईन नोंदणी करावयाची होती.

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ 438 जणांनीच ऑनलाईन नोंदणी केली. यातील 220 विद्यार्थी निकषात बसल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला. यातील 204 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये पूर्वप्राथमिक वर्गामध्ये 8 आणि इयत्ता पहिलीमध्ये 196 जागा भरण्यात आल्या. पूर्व प्राथमिक वर्गासाठी 43 तर इयत्ता पहिलीसाठी 688 अशा एकूण 731 जागा रिक्‍त राहिल्या. या प्रवेशासाठी असणार्‍या निकषात अनेकजण बसत नसल्याने या जागा रिक्‍त राहिल्या आहेत. याचबरोबर याची माहिती पालकांना नसणे हे सुद्धा जागा रिक्‍त राहण्याचे एक कारण आहे.