Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Konkan › प. ए. सोसायटी करणार शहीद जवानाच्या मुलांचा खर्च

प. ए. सोसायटी करणार शहीद जवानाच्या मुलांचा खर्च

Published On: Aug 17 2018 10:37PM | Last Updated: Aug 17 2018 8:20PMचिपळूण : खास प्रतिनिधी

तालुक्यातील ताम्हणमळा येथील शहीद जवान जयेंद्र तांबडे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च परशुराम एज्युकेशन सोसायटी करणार आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश गगनग्रास यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ही घोषणा केली. यावेळी संस्थेच्या वतीने वीरपत्नीचा सन्मानदेखील करण्यात आला.

परशुराम एज्युकेशन सोसायटी संकुलात 72 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश गगनग्रास, संचालक, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, कर्मचारी व पालक उपस्थित होते. सुरेश गद्रे प्रशालेचे मुख्याध्यापक  केदार शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ताम्हणमळा येथील शहीद जवान जयेंद्र तांबडे यांच्या पत्नी प्रियांका तांबडे यांचा सन्मान करण्यात आला.

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांपैकी ताम्हणमळा येथील जयेंद्र तांबडे या जवानाला देशाची सेवा बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांचा मुलगा अंकित हा संस्थेच्या शिशुविहारमध्ये शिकत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या वीर जवानाला परशुराम एज्युकेशन सोसायटी व उपस्थित सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच  जयेंद्र यांचा मुलगा अंकित याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी परशुराम एज्युकेशन सोसायटीने स्वीकारून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.