Wed, Apr 24, 2019 19:57होमपेज › Konkan › परशुराम देवस्थानची जमीन कुळांच्या नावे होणारः ना. पाटील

परशुराम देवस्थानची जमीन कुळांच्या नावे होणारः ना. पाटील

Published On: Jul 31 2018 10:34PM | Last Updated: Jul 31 2018 10:27PMचिपळूण : खास प्रतिनिधी

पेढे-परशुराम देवस्थान इनामप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत येत्या दोन महिन्यांत पेढे-परशुराममधील कुळांना जमिनीची मालकी शंभर टक्के देण्यात येईल. तसेच चौपदरीकरणात भूसंपादनासाठी आलेला निधी व अन्य प्रकल्पांतील नुकसानभरपाई 90 टक्के कुळांना व 10 टक्के देवस्थानला देण्यात येईल, असा निर्णय महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
 याबाबत त्यांनी संघर्ष समितीला आश्‍वासन दिले असून यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी ठाम भूमिका मांडली. यामुळे या प्रश्‍नाला न्याय मिळाला आहे.

देवस्थान इनाम प्रश्‍नाबाबत पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्‍वासनानुसार ना. पाटील यांच्या दालनात मंगळवारी (दि. 31) दु. 3 वा. बैठक झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, आ. सदानंद चव्हाण, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी प्रदीप पी., प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्‍वास सुर्वे, सरपंच प्रवीण पाकळे, गजानन कदम, सुरेश बहुतुले आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री पाटील यांनी संघर्ष समितीच्या बाजूने आश्‍वासन दिले. 

जिल्हाधिकार्‍यांमुळे न्याय 

जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली व ग्रामस्थांची समस्या शासनाच्या लक्षात आणून दिली. या नंतर चौपदरीकरणासाठी आलेला निधी 90 टक्के कुळांना व 10 टक्के परशुराम देवस्थानला देण्याचा निर्णय झाला. शिवाय येत्या दोन महिन्यांत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानच्या नावावर असलेली पेढे, परशुराममधील सर्व जमीन कुळांच्या नावे करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले.  यामुळे पेढे-परशुराम संघर्ष समितीला न्याय मिळाला.