Tue, Mar 19, 2019 12:05होमपेज › Konkan › महामार्गाची १० दिवसांत खड्डेमुक्ती 

महामार्गाची १० दिवसांत खड्डेमुक्ती 

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 31 2018 11:42PMपनवेल : प्रतिनिधी

केंद्राकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 10 हजार कोटी रुपये उपलब्ध झाल्याने पळस्पे फाटा ते झाराप या जवळपास 500 कि.मी.च्या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करू अन् डिसेंबर 2019 ती डेडलाईन पाळू ,अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे पाहणीच्या ऐतहासिक दौर्‍यात केली. केवळ निधी नसल्यामुळेच पळस्पे ते इंदापूर हे काम रखडले होते. मात्र, आता सर्व मार्गाचा निधी केंद्राने राज्याला दिला असल्याने आता काम रखडण्याचा प्रश्‍न उद्भवणार नाही, असे सांगताना पुढील 10 दिवसांत मुंबई-गोवा महामार्गाचे सर्व खड्डे भरले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्ड्यावरून सर्वत्र रण माजल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अवजड मंत्री ना. अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरतशेठ गोगावले, आ. अनिकेत तटकरे, आ. निरंजन डावखरे, राजिप अध्यक्षा आदिती तटकरे अशा असंख्य नेत्यांच्या फौजफाट्यासह खड्डे निरीक्षणाचा ऐतहासिक दौरा रायगड जिल्ह्यात जवळपास 120 कि.मी.च्या अंतरात करण्यात आला. यावेळी दहा दिवसांत मुंबई-गोवा खड्डेमुक्त करू, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्‍यांनाही कानपिचक्या दिल्या. माणगाव येथे महामार्गाची पाहणी करताना ना. पाटील म्हणाले, पळस्पे ते इंदापूर या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्याच्या कामाला निधी कमी पडला 

होता. म्हणून हे काम रखडले होते. मात्र,  आता या कामाला केंद्राकडून 10 हजार कोटीचा निधी उपलव्ध झाल्याने पनवेल ते सिंधुदुर्ग जिह्यातील बांदा पत्रादेवी पर्यंत हे काम जलद गतीने करीत उर्वरित  पुढील टप्पाही डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करू, असा ठाम विश्‍वास दिला. कोकणत पडणारा भरपूर पाऊस व महामार्गावरुन जाणारी अवजड वाहतूक व वाढती वाहनांची संख्या यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे पहिल्या टप्प्याचे काम निधीअभावी रखडले होते. याचा नामोल्लेख त्यांनी केला. या महामार्गाला सिंमेंट काँक्रिटच्या रस्त्याशिवाय पर्याय राहिला नाही हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करणार असून 10 ते 12 वर्ष या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. तरीही खड्डे पडलेच तर त्यास ठेकेदाराला जबाबदार धरले जाईल. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईतून कोकणात येत असतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर पडलेले सर्व खड्डे बुजवण्यात येतील. महामार्गाचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले असून पनवेल ते इंदापूर पर्यंत दोन टप्पे करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.