होमपेज › Konkan › तरुणांनी शोधला माणसात देव!

तरुणांनी शोधला माणसात देव!

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 9:36PMपंधरागाव : वार्ताहर

दगडाच्या मूर्तीला नमस्कार करुन देव भेटल्याचे समाधान मानणारी जगात खूप माणसे भेटतात. पण माणसात देव शोधणारा माणूस औषधालाच सापडेल. असेच काही तरूण चिपळूणमध्ये माणसातील देव शोधत आहेत. खेर्डीमध्ये तब्बल पंधरा वर्षे एकाच झाडाखाली राहणार्‍या अनोळखी व्यक्तीला या तरूणांनी नव्या जगाची ओळख करुन दिली. 
खेर्डी येथे तब्बल पंधरा वर्षे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशा सर्वच ऋतुत निसर्गाशी झगडत झाडाखाली राहणारा एक माणूस अलिकडे तेथे दिसत नाही. कारण या जर्जर झालेल्या माणसाला संकेत तांबे, संकेत सावंत, सचिन शिंदे, जिज्ञेश बालन या चौघांनी नवे जग दाखविले आहे. जर्जर झालेली ही व्यक्ती अनेक दिवस लोकांना येथे दिसत होती. जेवण-खाणे, कपडे याचा कसलाच पत्ता नसताना जो तुकडा टाकेल त्याच्यावर हा माणूस जगत होता. अनेकांना जाता-येताना ही व्यक्ती दिसायची. कोणी त्याला मदतीचा हात द्यायचा. त्यावरच तो दिवस कंठत होता. मात्र, अलीकडच्या पंधरा दिवसांत ही व्यक्ती तेथून गायब झाल्याने ती नेमकी कुठे गेली असेल याची चर्चा खेर्डीमध्ये सुरू आहे. मात्र, माणसात देव शोधणार्‍या या तरूणांनी या व्यक्तीचा कायापालटच केला आहे. 

या तरूणांनी या माणसाला रुग्णवाहिकतून कामथे रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी परिचारिका व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या माध्यमातून त्याची स्वच्छता केली. त्या नंतर त्याची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली. जर्जर झालेली ही व्यक्ती आता सर्वसामान्यांत आली आहे. मात्र, अधिक उपचारासाठी त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वत:चे घर ना दार, इतकेच काय ओळखही न सांगता येणार्‍या या व्यक्तीला या तरूणांनी आधार दिला. अजूनही व्यक्तीची ओळख पटलेली नसून ती व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंधरा वर्षे एका झाडाखाली तपश्‍चर्या करावी अशाच अवस्थेत असणार्‍या या माणसाला या तरूणांनी आधार देत माणसातील देव शोधला.