Mon, May 20, 2019 21:02होमपेज › Konkan › पालशेत-निवोशीत होणार रेसकोर्स

पालशेत-निवोशीत होणार रेसकोर्स

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 10:51PMशृंगारतळी : वार्ताहर

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गुहागर तालुक्यातील पालशेत निवोशी येथे रेसकोर्स प्रकल्प होणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 हेक्टर जागा घेण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी दिली आहे.  कोकणात पर्यटकांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन शासकीय पर्यटन विकास महामंडळासह खासगी कंपन्याही विविध उपक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना अमलात आणत आहेत. मुंबई येथील रेसकोर्स बंद झाल्यानंतर महामंडळातर्फे हा उपक्रम अन्यत्र राबविण्यासंबंधी शासकीय स्तरावर चर्चा सुरू होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे रेसकोर्ससाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू होती. त्यानुसार गुहागर तालुक्यातील पालशेत-निवोशी जवळची जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवडली आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 37 हेक्टर जागा रेसकोर्ससाठी संपादित करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापकांनी दिली आहे.  केंद्र स्तरावर या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे बाकी असून जर हा प्रकल्प कार्यान्वित झाला तर गुहागर तालुक्याच्या पर्यटनामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या किनारपट्टीसह अन्य ठिकाणीही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे सुरू झालेल्या निवास न्याहरी योजनेलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी नोंदणी करणार्‍या व्यवसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होत आहे.  गुहागर तालुक्यात कारखाने वा इतर उद्योग नसल्याने येथील सुशिक्षित तरूणवर्ग हा व्यवसाय व नोकरीसाठी शहराची वाट धरतो. पारंपरिक शेतीकडे येथील शेतकर्‍याने पाठ फिरवली असून पर्यटनाच्या माध्यमातून काही ठराविक गावातून रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु रेसकोर्ससारखा मोठा प्रकल्प गुहागर तालुक्यात सुरू झाल्यास अनेक व्यावसायिकांना व येथील तरूणांना व्यवसाय मिळू शकेल, अशी आशा व्यक्‍त होत आहे.