Tue, Apr 23, 2019 07:34



होमपेज › Konkan › ‘पीओपी’ गणेशमूर्तींचा प्रश्‍न ऐरणीवर

‘पीओपी’ गणेशमूर्तींचा प्रश्‍न ऐरणीवर

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 10:56PM



आरवली : जाकीर शेकासन

गणेशोत्सव दोन महिन्यांवर आला असताना गणेशोत्सवाचे मंडप, उत्सवातून होणारे प्रदूषण याचबरोबर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींबाबत गेली काही वर्षे सातत्याने ओरड होतेय. मात्र, या बाबतीत काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. शाडूच्या गणेशमूर्तींची संख्या कमी होत गेली, कारण शाडूची गणेशमूर्ती घडविणारे कारागिर आता घटलेत. शाडूची मूर्ती घडवायला खूप वेळ लागतो. गणेशमूर्तींची मागणी एवढी वाढल्याने त्यांचे उत्पादन वाढविणे आवश्यक होते. कारागीरच नसतील तर पीओपीच्या मूर्तींकडे वळण्याशिवाय पर्याय राहत नाही. शिवाय शाडूच्या मूर्तीचे वजन अधिक असते. त्या तुलनेत पीओपीची मूर्ती हलकी असते.

किंमतीच्या बाबतीत विचार केला तर पीओपीची गणेशमूर्ती ही शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत जवळपास निम्म्या किमतीत मिळते. या सर्व मुद्यांमुळे लोकांची पसंती आपोआपच पीओपीच्या गणेशमूर्तींना मिळू लागली. आज बनणार्‍या एकूण गणेशमूर्तींपैकी सुमारे 20 टक्के मूर्ती शाडूच्या असतात. गणेशमूर्तींना लागणारी शाडूची माती ही मुख्यतः गुजरातमधून येते. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मूर्ती घडवायच्या असतील तर माती कुठून आणायची, हा मोठा प्रश्न मूर्तिकारांपुढे असेल. गोव्यात शाडूच्या गणेशमूर्तींसाठी सरकारकडून काही सवलती दिल्या जातात. महाराष्ट्र सरकारही अशी काही पावले उचलणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

मध्यंतरी कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनविण्याचा प्रयत्न झाला होता. पण, त्याला म्हणावे तसे यश आले नाही. पीओपी म्हणजेही एक प्रकारे मातीच आहे. त्याला ‘हिटिंग’ दिले की ती कडक होते. पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव हा पर्याय चांगला असू शकतो. समुद्रात किंवा तलावात पीओपीमुळे होणारे प्रदूषण यातून टाळता येऊ शकते.  महाराष्ट्र शासनाने पीओपी मूर्तींवर बंदी घातल्यास कारागिरांच्य रोजगाराचा प्रश्‍न निर्माण  होऊ शकतो