Wed, Mar 27, 2019 02:35होमपेज › Konkan › देवरूखात ‘पीओपी’च्या गणेशमूर्ती दाखल

देवरूखात ‘पीओपी’च्या गणेशमूर्ती दाखल

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:36PMदेवरूख : प्रतिनिधी

चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे श्रीगणेश. यावर्षी श्रींचे 13 सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नुकत्याच दाखल झाल्या आहेत. आठ महिने सुन्या सुन्या वाटणार्‍या गणेश चित्रशाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. यामुळे भक्तगणांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.

कोकणात गणेशोत्सव हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. आबालवृध्द आतुरतेने या सणाची वाट पाहत असतात. कामानिमित्त मुंबई, पुणे शहरात असलेले चाकरमानी आवर्जून गावात येऊन उत्सवाची मौजमजा लुटतात. सर्वांच्या आवडीचा हा उत्सव यावर्षी 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. या धर्तीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये पीओपीच्या 2 फुटापासून 6 फुटापर्यंत मूर्ती दाखल झाल्या आहेत. 

शहरात आप्पा साळसकर, भाई कुमटेकर, नागेश बारटक्के, दत्ता शिंदे, नंदकुमार पाटेकर, आशिष बेलवलकर, अनिल व रवींद्र राजवाडे, श्रीकांत शेट्ये, नरेंद्र भोंदे, भाऊ घडशी, सुधीर सालम, बापू नारकर आदींच्या गणेश चित्रशाळा आहेत. यावर्षी श्रींच्या मूर्ती 13 सप्टेंबर रोजी घरोघरी विराजमान होणार आहेत. 15 रोजी गौरीचे आगमन, 16 रोजी गौरी आवाहन व 17 रोजी गौरींसह पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीदिनापर्यंत स्थानापन्न होणार्‍या गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. 

हा उत्सव चार महिन्यांवर येवून ठेपला आहे. काही गणेश चित्रशाळांमध्ये पीओपीच्या गणेशमूर्ती या पेण, कोल्हापूर येथून आणण्यात आल्या आहेत. पीओपीच्या मूर्ती या सुंदर, रेखीव व वजनाने हलक्या असतात. मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीच्या मूर्तीची किंमत कमी असते. यामुळे भक्तगण पीओपीच्या मूर्तीना जास्त पसंती देतात. हिच कास मूर्तीकारांनी हेरून पीओपीच्या मूर्ती आणल्या आहेत. भव्य मूर्ती पाहण्यासाठी भक्तगणांची पावले चित्रशाळेच्या दिशेने वळू लागली आहेत.