Thu, Jul 18, 2019 00:02



होमपेज › Konkan › पीएफ खात्यात न भरल्याची वस्तूस्थितीच

पीएफ खात्यात न भरल्याची वस्तूस्थितीच

Published On: Jan 26 2018 12:26AM | Last Updated: Jan 26 2018 12:10AM



देवरूख : प्रतिनिधी

1995 ते 2005 या कालावधीत त्यावेळच्या मातृमंदिर कार्यकारिणीने कर्मचार्‍यांची प्रॉव्हिडंड फंडासाठी जमा केलेली रक्‍कम प्रत्यक्ष प्रॉव्हिडंड खात्यात भरलेली नाही, ही वस्तूस्थिती आहे. या संदर्भात मागील कार्यकारिणीने ही रक्‍कम प्रॉव्हिडंड खात्यात का भरणा केली नाही? याचा संदर्भ आम्हाला समजू शकला नसल्याची कबुली कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि कार्यवाह आत्माराम मेस्त्री  यांनी दिली. मातृमंदिर संस्थेच्या कर्मचार्‍यांचा प्रॉव्हिडंड फंड रक्‍कम त्यांच्या खात्यावर जमा न केल्याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रार प्रकरणी विद्यमान कार्यकारिणी पदाधिकारी म्हणून हेगशेट्ये व मेस्त्री पत्रकारांशी गुरूवारी बोलत होते.

हेगशेट्ये म्हणाले, सध्या या संदर्भात नवी कार्यकारिणी 1995 ते 2005 च्या संदर्भीत तपशीलाची माहिती घेत आहे. त्या काळातील काही संदर्भ कागदपत्रे उपलब्धही होत नाहीत. मात्र, ते शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. विद्यमान कार्यकारिणीच्या कालावधीतील प्रॉव्हिडंड फंड व सारे व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. वास्तवात 1995 ते 2005 या कालावधीत त्या वेळच्या सन्माननीय कार्यकारी मंडळाने अशा प्रकारे कर्मचारी विरोधातील आचरण का केले? याचे आश्‍चर्य वाटते.

वास्तवात नियमाप्रमाणे त्या कार्यकारिणीची या कथित अपहार संदर्भात संपूर्ण जबाबदारी आहे. काही मान्यवरांच्या एकाधिकारशाही आणि हटवादीपणामुळे संस्थेला या आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.  या कथित आर्थिक अपहाराशी आमचा दुरान्वयेही संबंध नसला तरीही विद्यमान कार्यकारिणी पदाधिकारी या नात्याने संस्था म्हणून ही जबाबदारी विद्यमान कार्यकारिणी टाळू इच्छित नाही. प्रॉव्हिडंड फंड हा कर्मचार्‍यांचा अधिकार आहे. तो त्यांना मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि तिचा पाठपुरावा गेल्या 6 वर्षांत कार्यकारी मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत सातत्याने करण्यात आला आहे.कर्मचार्‍यांना त्यांच्या हक्‍काचा प्रा. फंड मिळवून देण्यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्नशील आहोत, असेही हेगशेट्ये म्हणाले.