Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Konkan › घराला लागलेल्या आगीत सापडून मालकाचा मृत्यू

घराला लागलेल्या आगीत सापडून मालकाचा मृत्यू

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:18AMमालवण : प्रतिनिधी

माचीसच्या काडीमुळे उडालेल्या ठिणगीने घराला लाग लागून गंभीररित्या भाजलेल्या उमेश उर्फ बाळा पांडुरंग माळगावकर (55) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मालवण शहरातील मेढा- जोशीवाडा येथे  मंगळवारी रात्री घडली. घरात एकट्याच राहणार्‍या उमेश माळगावकर यांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने मेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अविवाहित असणारे उमेश उर्फ बाळा माळगावकर हे मेढा जोशीवाडा येथील आपल्या घरात  एकटेच राहत होते. त्यांच्या घराचे अर्धवट स्थितीत चिरेबंदी बांधकाम झालेले असून घराला पत्रे आणि माडाच्या झावळानी शाकारले होते. मासेमारी व मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असत. मंगळवारी रात्री 11:30 वा. च्या सुमारास ते  घरी परतले. ते घराचे कुलूप उघडण्यासाठी गेले असता त्यांच्या हातातील चावी निसटून खाली पडली. अंधार असल्याने त्यांनी  माचीसची   काडी पेटवून पडलेली चावी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक काड्या पेटवूनही चावी न सापडल्याने त्यांनी शेजारी रमेश कोळंबकर यांच्या मदतीने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान अनावधानाने त्यांनी इतरत्र फेकलेल्या पेटत्या माचिस काड्या छप्पराच्या सुक्या झावळांवर पडल्याने झावळांनी पेट घेतला होता.  मात्र याची कल्पना नसल्याने ते घरातील पलंगावर झोपी गेले.

रात्री 12 वा. च्या सुमारास त्यांच्या घराला आग लागल्याचे शेजारी लीलाधर आचरेकर यांना दिसून आले. श्री. माळगावकर यांनी परिस्थितीतचे गाभीर्य ओळखून   तात्काळ आपल्या पाण्याचा पंप चालू करत पेटत्या घरावर  पाण्याचा  मारा सुरू केला. तसेच आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना माहिती दिली. दरम्यान नगरपालिकेचा अग्निशमन बंब कुणकेश्‍वर यात्रास्थळी पाठविण्यात आल्याने नागरिकांनी तीन पंपाद्वारे पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र घर झावळानी शाकारलेले असल्याने तसेच घराच्या पुढील बाजूस मोठ्या प्रमाणात जळावू लाकडे ठेवलेली असल्याने ही  आग अधिकच भडकली होती, परिणामी ती आटोक्यात आली नाही. 

नागरिकांनी घरात असलेल्या बाळा माळगावकर यांना हाका मारत बाहेर येण्यास सांगितले. मात्र दुर्दैवाने माळगावकर हे मद्याच्या नशेत असल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दुसरीकडे संपूर्ण घर पेटलेले असल्याने नारिकांना घरात प्रवेश करणेही शक्य होत नव्हते.  माळगावकर ज्या पलंगावर झोपले होते त्या पलंगावरील चादरींनी पेट घेतल्याने माळगावकर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. 

लीलाधर आचरेकर, रोहित खडपकर, संतोष तांडेल, संदीप तांडेल, दिलीप आचरेकर, विशाल आचरेकर, बाबा आचरेकर, रोहित जोशी, रमेश कोळंबकर आदी व इतरांनी अथक प्रयत्न करत अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण आणले. दरम्यान  रोहित खडपकर याने स्वतःचा जीव धोक्यात घालत घराच्या बाजूकडील मोकळ्या भागातून घरात प्रवेश करत लीलाधर आचरेकर यांच्या मदतीने गंभीर भाजलेल्या अवस्थेतील बाळा माळगावकर यांना घराबाहेर आणले. यात रोहित याच्या हाताला दुखापत झाली.

सुमारे 80 टक्के भाजलेल्या माळगावकर यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर रित्या भाजल्याने बाळा माळगावकर यांचा बुधवारी सकाळी 8 वा. च्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.