Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Konkan › सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:35PMओरोस : प्रतिनिधी

शासनाच्या आयएसओ मानांकनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच 70 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्याचा मान  राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा पशुवैद्यकीय विभागाला मिळाला आहे, अशी माहिती  पशुसंवर्धन समिती सभेत देण्यात आली.  समितीची सभा सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य सावी लोके, अनुप्रिती खोचरे, रोहिणी गावडे, मनस्वी घारे, स्वरूपा विखाळे, भाग्यलक्ष्मी साटम आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.  

जि. प. पशुसंवर्धन विभागाने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे सिंधुदुर्गातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. या उपक्रमासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली. उपक्रमासाठी  जि. प. च्या स्वउत्पन्‍नातून 3 लाख रु. खर्च करण्यात आले. 1 जानेवारी 2018 रोजी आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याचे 70 पशुदवाखान्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. लवकरच एका भरगच्च कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वितरण होणार आहे. 

चार नव्या योजनांतून 6 कोटी 50 लाख मिळणार

चांदा ते बांदा योजनेतून सिंधुदुर्ग जि. प. पशुसंवर्धन विभागासाठी बचतगटामार्फत कुक्कुटपालन, शेळागट, चारा निर्मिती, दूध संस्था डेव्हलपमेंट यांसह उपक्रमातून एकूण 6 कोटी 50 लाख नियतव्य मंजूर केला आहे. त्यात चार प्रकारच्या या योजनेत 40 बचतगटांचे एक कुक्कुटग्रामसाठी 2 कोटी 52 लाख, दूध संस्था विकसित करणे, दुधाळ जनावरे 1 कोटी, शेळीगटासाठी 2 कोटी 23 लाख, चारा निर्मिती 50 लाखांची तरतूद मंजूर असून अनुदान प्राप्त होताच या योजनांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. गोठा बांधणे योजना ग्रामपंचायत पातळीवर राबविला जात आहे.रोजगार हमी योजनेतून अस्तित्वातील गोठ्याची दुरुस्ती कामे हाती घेण्यात येत असल्याचे सांगितले. दुधाळ जनावरे खरेदी योजना जि. प. मार्फत 100 प्रकरणे मंजुरी दिली आहे.