Fri, Jul 19, 2019 07:23होमपेज › Konkan › पण पुढच्या जन्मात शिक्षक होणार नाही!

पण पुढच्या जन्मात शिक्षक होणार नाही!

Published On: May 15 2018 10:43PM | Last Updated: May 15 2018 10:43PMओरोस : प्रतिनिधी 

‘न्याय द्या, आम्हाला न्याय द्या... ना. तावडे साहेब न्याय द्या,  शाळा आमची पोरा आमची... शिक्षक कित्याक भायलो...’ अशी गाणी ढोलकीच्या तालावर सादर करत येथील डीएड्, बीएड् धारकांनी उपोषणाचा दुसरा दिवस गाजवला. “या जन्मात शिक्षक झालो, पण पुढच्या जन्मात शिक्षक होणार नाही’’, अशी व्यथा या गाण्यांमधून मांडण्यात आली. शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत सिंधुदुर्ग-रत्नागिरी डीएड्, बीएड् धारक संघटनेने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरु केले आहेे.

शिक्षक भरतीत स्थानिकांवर वारंवार अन्याय होत आहे. त्यातच शिक्षक भरती परीक्षेत गुण वाढवून देणारे रॅकेट सक्रीय झाले आहे. 2010 सालीही असे रॅकेट कार्यरत असल्याचे पुरावे देखील पोलिसांकडे देण्यात आले. मागील आठ वर्षे शिक्षक भरती झाली नसल्याने डीएड्, बीएड्चे शिक्षण घेऊन अनेकजण बेकार आहेत. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या कोकणातील जिल्ह्यांमधून स्थानिक शिक्षक भरतीची मागणी जोर धरू लागली आहे. 2010 साली शिक्षक भरती झाली. त्यावेळी विदर्भ मराठवाड्यातील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात करण्यात आले. आताही तेच धोरण रेटले जात असल्याने हा कुटील डाव आम्ही हाणून पाडू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. 

शासनाचे लक्ष वेधावे यासाठी विविध अन्याय व्यक्त  करणारी गाणी उपोषणात सादर करण्यात आली. उपस्थितांनीही ढोलकीचा ठेका धरत गाणी सादर करून अन्याय व्यक्त केला. “ या जन्मात शिक्षक झालो पण पुढच्या जन्मात शिक्षक होणार नाही’’, अशी व्यथा या गाण्यांमधून मांडण्यात आली. प्रभुदास आसगावकर यांनी गीत गायले. अक्षय सातार्डेकर यांनी ढोलकी साथ केली. 14 पासून सुरू असलेल्या उपोषणात रणरागिणींचा सहभाग मोठया संख्येने आहे. स्थानिकांना न्याय द्या, नाहीतर खूर्च्या खाली करा... आमच्या भावनांशी खेळू नका, असा रोखठोक इशाराही या रणरागिणींनी यावेळी दिला. शासनाला जाग येईपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचेही रणरागिणींनी ठणकावून सांगितले. 

चिमुकल्यांसह मातांची उपस्थिती 

शासनाच्या सातत्याने बदलणाऱया धोरणाचा फटका तरुणांसह, तरुणींनाही बसला. याचा निषेध करण्यासाठी या उपोषणात आपल्या चिमुकल्यांसह काही माता उपस्थित राहिल्या. दीक्षा नाईक व स्मिता तळणकर या माता चिमुकल्यांसह उपस्थित राहिल्या. राज्यकर्त्यांनो आता तरी न्याय द्या, अशी आर्त आर्जव यावेळी त्यांनी केली. अनेकांचे पालकही या उपोषणात सामील झाले होते. 

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 

सलग दोन दिवस डीएड्, बीएड् धारकांनी उपोषण केले. परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र पाठ फिरवली. निवडणुका आल्या की मते मागायला येणार्‍या व तरुणाईची बिरुदावली मिरवणार्‍या नेत्यांना आमच्यावरील अन्यायाचा विसर पडला की काय? असा संतप्त सवाल उपोषणकर्त्यांनी केला. आमचा प्रश्‍न मार्गी न लावल्यास येथील लोकप्रतिनिधींना त्यांची जागा निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशाराही यावेळी देण्यात आला.