होमपेज › Konkan › भारतीय युवा  मोर्चाच्या वतीने युवा रोजगार संवाद यात्रेचे आयोजन

भारतीय युवा  मोर्चाच्या वतीने युवा रोजगार संवाद यात्रेचे आयोजन

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 9:05PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

भाजप युवा मोर्चातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण युवकांना या जिल्ह्यातच नोकरी व रोजगार मिळवून देण्यासाठी खास पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. जेणेकरून स्थानिक बेरोजगार तरुण मुंबई किंवा पुणे अशा मोठ्या शहरात जाऊन तुटपुंजा पगारावर राहण्यापेक्षा या जिल्ह्यात राहून त्यांना घरच्या घरी डाळ भाकर खायला मिळावे आणि त्यांचा घरसंसार सुरळीत चालावा यासाठी  भारतीय युवा  मोर्चाच्या वतीने ‘युवा रोजगार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे भाजपा विधानसभा मतदारसंघप्रमुख तथा युवा रोजगार संवाद यात्रा जिल्हा संयोजक निशांत तोरसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.भाजपा  जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, जिल्हा सरचिटणीस संदीप पाटील, प्रशांत जोशी,गोविंद साटेलकर, गौरेश कामत,  सूरज कारिवडेकर  आदी उपस्थित होते.

निशांत तोरसकर म्हणाले, शनिवार 7 जुलैला कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली युवा रोजगार संवाद यात्रेच्या नियोजन बैठक होणार असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील कुडाळ एमआयडीसीतील वायमन गार्डन सह अनेक प्रकल्प बंद पडले त्याजागी दुसरे प्रकल्प सुरू झालेले नाही.नाणार, सीवर्ल्डसारखे प्रकल्प व्हायला हवेत. मात्र, कोकणात येऊ घातलेले मोठमोठे प्रकल्प पाहता नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. यासाठी बेरोजगारांना प्रशिक्षण घेण्यासाठी युवा रोजगार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बेरोजगार तरुणांची यादी करणे, भविष्यात येणार्‍या प्रकल्पांमध्ये पात्र ठरू शकतील.  आवश्यक पात्रता काय हवी त्यानुसार प्रशिक्षण देऊन त्या तरुणांना सेवेत सामावून घेण्यात येण्यासाठी हा युवा रोजगार संवाद भारतीय युवा मोर्चाने हाती घेतला आहे.  यासाठी आयटीआय ट्रेडमध्येही आवश्यक ते कोर्सेस आणले जातील, असे निशांत तोरसकर यांनी सांगितले.  

सिंधुदुर्गवासीयांसाठी खास कोटा ठेवला जावा. भविष्यात होणार्‍या मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. पर्यटनातूनही बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न याद्वारे करुन व्यवसाय सुरू करणार्‍या तरुणांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास  उन्नती योजनेअंतर्गत कोणत्याही व्यवसायासाठी दहा लाखांच्या कर्जावर  12 टक्के व्याजाचा परतावा मिळणार आहे. याची माहिती बेरोजगारांना दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.  सिंधुदुर्गात प्रकल्पांना नेहमीच विरोध केला जात आहे. यात बेरोजगार युवकांचा बळी जात आहे.विरोध करणारे मात्र आपली पोळी भाजून घेण्याचे काम करीत असल्याचा आरोप जिल्हा सरचिटणीस राजू राऊळ यांनी यांनी केला तर नाणार प्रकल्प व्हायलाच हवा जेणेकरून येथील युवकांना नोकर्‍या मिळतील असे भाजप युवा मोर्चाचे भाजप रोजगार रोजगार संवाद यात्रेचे जिल्हा संयोजक व भाजप जिल्हाध्यक्ष राजू राऊळ यांनी  स्पष्ट केले.

चेन मार्केटिंगसाठी स्वतंत्र कायद्याची मागणी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या सुरु असलेल्या चेन मार्केटिंगच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी निवेदन सादर करुन मुख्यमंत्र्यांना चेन मार्केटिंगबाबत एक ग्राहक संरक्षक कायदा करावा, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.तरुण चैन मार्केटिंगसारखे विषय घेऊन त्यामागे लागतात व आर्थिक अडचणीत येतात. त्यामुळे या तरुणांना वाममार्गापासून चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे निशांत तोरस्कर यांनी सांगितले.