Sun, Dec 15, 2019 02:00होमपेज › Konkan › सेंद्रिय आंबा ‘राजधानी’तून दिल्‍लीला

सेंद्रिय आंबा ‘राजधानी’तून दिल्‍लीला

Published On: Apr 22 2019 1:33AM | Last Updated: Apr 22 2019 1:33AM
रत्नागिरी ः विशाल मोरे

सेंद्रिय आंब्याला मुंबईतील ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहता आता हा आंबा दिल्‍लीला पाठवण्यात येणार आहे. मुलूंडच्या अनघा सावंत यांच्या सिद्धी ऑर्गेनिक कंपनीमार्फत राजधानी एक्स्प्रेसमधून हा आंबा दिल्‍ली मार्केटमध्ये पाठवण्यात येणार आहे. यासाठी 100 किलोमागे 650 रुपये चार्ज पडणार असून, 80 रुपये हमालीसाठी खर्च येणार आहे. त्यामुळे कोकणच्या हापूसची चव दिल्‍लीवासीयांना माफक दरात चाखता येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विस्तार अधिकारी अरिफ शहा यांनी दिली.

तालुक्यात वाटद येथे सेंद्रिय पद्धतीने तयार झालेला आंबा मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यावर त्याला ग्राहकांनी पहिली पसंती दिली आहे. आतापर्यंत 100 पेट्या पाठवण्यात आल्या असून, त्या हातोहात संपल्या आहेत. हा आंबा खरेदी करण्यासाठी आणखी तीन कंपन्यांनी मागणी केली आहे.

रासायनिक औषधांचा वापर करून केलेली फवारणी, रासायनिक खतांचा वापर आणि रासायनिक पद्धत वापरून पिकवलेला आंबा याचे दुष्परिणाम दिसून आल्यावर कृषी विभागाकडून सेंद्रिय पद्धतीला प्राधान्य देण्यात येत आहे. तालुक्यातील वाटद परिसरात सेंद्रिय पद्धतीने आंबा पीक घेतले जात आहे. हा आंबा काढणीयोग्य झाला असून, त्याची तोड सुरू आहे. भाताच्या पेंढ्यात तीन दिवस हा आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवल्यानंतर दि. 11 रोजी तो मुंबईला पाठवण्यात आला. तेथील ग्राहकांना हा आंबा आवडला. 

सेंद्रिय आंब्यासाठी दर निश्‍चित करण्यात आला आहे. त्यानुसार प्राईम ग्रेडसाठी एप्रिल महिन्यात प्रतीडझन 400 रु. तर मे महिन्यात 300 रु. दर निश्‍चित करण्यात आला आहे. तर क्लासिक ग्रेडसाठी एप्रिल महिन्यात प्रतिडझन 350 रु. तर मे महिन्यासाठी 250 रु.असा दर निश्‍चित करण्यात आला आहे. यामुळे शेतकर्‍यांचा ट्रान्सपोर्ट, दलालीचा खर्च वाचणार आहे. सेंद्रीय आंब्याला हमीभाव देण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांनी तयार आंबाच काढावा, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.

मुंबईतून मागणी वाढली

रत्नागिरीतील शेतकर्‍यांची कंपनी असलेल्या रत्नागिरी आर्गेनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमार्फत शेतकर्‍यांकडील आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे. या कंपनीकडून हा आंबा इंडिकस अ‍ॅग्रोटिस कंपनीने खरेदी केला होता. पहिल्या टप्प्यात 100 पेट्या मुंबईला पाठविण्यात आल्या. आता या आंब्याची मागणी वाढली असून, गो फॉर फ्रेश, समृद्धी ऑर्गेनिक आणि श्री सिद्धी ऑर्गेनिक या कंपन्यांनी सेंद्रीय आंब्याची मागणी केली आहे. पुढील दोन महिन्यांत 2 हजार पेट्या पाठविण्यात येणार आहेत.