Tue, Jul 16, 2019 12:28होमपेज › Konkan › सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी ‘जैविक शेती मिशन’

सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी ‘जैविक शेती मिशन’

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 10:23PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच कीटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रीय शेतीला चालना देण्यात येत आहे. त्यानुसार सेंद्रीय शेती-विषमुक्‍त शेतीच्या राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ‘डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन’ स्थापन करण्यात  आले आहे.  या मिशनच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेती माल वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे विषमुक्‍त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.  

पहिल्या टप्प्यात या मिशनच्या माध्यमातून निवडक जिल्ह्यांपासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांतही व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.  सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, ही प्रणाली सक्षम प्राधिकार्‍यांच्या मान्यतेने तयार करून इतरत्र प्रसारित करणे, राज्यातील शेतकर्‍यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेती मालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रीय शेतमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी उद्दिष्टे या मिशनच्या माध्यमातून साध्य करण्यात येणार आहेत. याच मिशनच्या माध्यमातून स्थानिक ग्राहकांना विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध करण्याचा सरकारचा निर्धार आहे. 

या मिशनसाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सेंद्रीय शेती-विषमुक्‍त शेती या योजनेसाठी 100 कोटींची तरतूद केली होती.  त्यानुसार केंद्र शासनाच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सेंद्रीय शेतीसाठी राज्य पुरस्कृत स्वतंत्र योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.  या पार्श्‍वभूमीवर नागरिकांचा जैविक शेतीतून उत्पादित होणार्‍या उत्पादनांकडे वाढता कल आहे.  परदेशातूनही अशाच फळपिकांना मागणी आहे. त्यातून सेंद्रिय (जैविक) शेतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे.