होमपेज › Konkan › आकाश फिश मिलच्या सांडपाण्याची तपासणी करण्याचे आदेश

आकाश फिश मिलच्या सांडपाण्याची तपासणी करण्याचे आदेश

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:30PMवेंगुर्ले : प्रतिनिधी 

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस येथील आकाश फिश मिलचे सांडपाणी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत असून याबाबत तात्काळ पाहणी करून पाणी नमुने तपासण्यात यावेत, अशी मागणी पं.स. सदस्या सौ. गौरवी मडवळ यांनी केली. यावर सभापती यशवंत परब यांनी दोन दिवसांपूर्वीच या मिलला भेट दिली असून त्याचे पाणी नमुनेदेखील तपासण्यात आलेले आहेत. त्यामुळे या पाण्याचा कोणताही धोका नसल्याचे सांगितले.  मात्र, पुन्हा एकदा या पाण्याचे नमुने तपासण्याच्या मागणी सौ. मडवळ यांनी  लावून धरली. यावर सभापतींनी पाणी नमुने पुन्हा तपासण्याचे आदेश दिले. 

वेंगुर्ले पं. स. ची मासिक सभा सभापती यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. उपसभापती सौ. स्मिता दामले, पं.स. सदस्य सिद्धेश परब, भाई मोरजकर, मंगेश कामत, सौ. अनुश्री कांबळी, सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आकाश फिश मिलच्या दूषित सांडपाण्याचा मुद्दा त्या भागाच्या पं. स. सदस्या सौ. गौरवी मडवळ यांनी उपस्थितीत केला. हे दूषित पाणी सार्वजनिक ठिकाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असून याबाबत दूषित पाण्याचे नमुने तपासण्याची मागणी केली. यावर सभापती यशवंत परब यांनी आपण अलिकडेच आकाश फिश मिलला भेट दिली, त्यावेळी  सदर दूषित पाण्याची तपासणीही केली. हे पाणी शुद्धीकरण प्लांटमध्ये शुद्ध करून सोडण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्यापासून कोणताही अपाय नसल्याचा दावा केला. मात्र, सौ. मडवळ पाण्याचे नमुने तपासणीच्या मागणीवर ठाम राहिल्याने सभापतींनी तसे आदेश दिले. म्हापण भागात इंदिरा आवास योजनेतून घरांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची काही घरे बंद आहेत तर काहींनी आपली घरे भाड्याला दिली असल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. अशा लाभार्थ्यांवर योग्य ती कारवाई करावीची मागणी करण्यात आली.

तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. मार्च महिना सपंत आला तरी ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा विभागाने अंदाजपत्रके सादर न केल्याने ग्रापापुचे अभियंता वळंजू यांना सभापती, उपसभापती तसेच सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. श्री. वळंजू यांनी आपणाकडे  कुडाळ तालुक्यातील काही गावांची कामे असल्याचे कारण दिले असता, सदस्य भाई मोरजकर यांनी आपण कुडाळ नाही वेंगुर्ले तालुक्यात मासिक बैठकसाठी आला आहात याचे भान ठेवा असे सुनावले. सभापतींनी इथल्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार येत्या दोन दिवसात सर्व ग्रा.पं. ची अंदाजपत्रके पोहचली पाहिजेत, असे आदेश दिले. कोकण पर्यटन अंतर्गत मंजूर स्ट्रीटलाईटची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रा.पं.नी अंदाजपत्रके दिलेली नाहीत, मूल्यांकन पत्रे तात्काळ दिली जावीत, अशी मागणी करण्यात आली. सदस्या सौ. अनुश्री कांबळी यांनी ग्रामविकासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या पं. स. सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार दिले जावेत. सदस्यांना योग्य निधी मिळावा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, राज्याच्या अर्थसंकल्पात पंचायत समित्यांसाठी स्वतंत्र विकासनिधीची तरतूद व्हावी, असे ठराव घेऊन शासनाकडे पाठवण्याची मागणी केली. सदस्या सौ. साक्षी नाईक यांनी आडेली पं.स. मतदारसंघातील साकव तसेच विविध प्रलंबित कामांची मागणी बैठकीत केली.