Fri, Apr 19, 2019 12:10होमपेज › Konkan › गुजरातसाठी कोकणची राख होऊ देणार नाही

गुजरातसाठी कोकणची राख होऊ देणार नाही

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 8:44PMचिपळूण : शहर वार्ताहर

कोकणचे निसर्गसौंदर्य व संपत्ती ही दैवी देणगी असून तिला धक्का लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. विघातक रासायनिक प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणची राख करायची आणि त्या राखेची रांगोळी गुजरातमध्ये काढायची, हे आता शिवसेना सहन करणार नाही, अशी भूमिका नाणार रिफायनरी संदर्भात राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मांडली.

ना. कदम यांनी नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविषयी सेनेची भूमिका आपल्या जामगे येथील निवासस्थानी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. शिवसेनेचा या प्रकल्पाला प्रथमपासूनच विरोध आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील जनतेच्या भावना ओळखून या प्रकल्पाला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील या प्रकल्पाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांनी या संदर्भातील प्रश्‍नाला दिलेल्या उत्तराचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. पर्यावरण विभागाकडून या प्रकल्पाला कोणतीही परवानगी दिलेली नाही. प्रकल्पाला विरोध असल्याचे पत्र आपण मुख्यमंत्र्यांकडे दोनवेळा सादर केले आहे. याबाबत नाणार परिसरातील प्रकल्पविरोधी समितीचे वालम यांना देखील या पत्राची प्रत मिळाली आहे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी विषयी विरोध असल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केली आहे. कोकणात यापुढे एकही रासायनिक प्रकल्प उभा करू दिला जाणार नाही, ही सेनेची ठाम भूमिका राहील. स्वातंत्र्यानंतर मागील युती शासन सोडल्यास सर्वच सरकारानी कोकणवर अन्याय केला आहे. सिंचनाच्या बाबतीत पश्‍चिम महाराष्ट्राला अठरा टक्के, मराठवाड्याला दहा, विदर्भाला साडेनऊ तर कोकणच्या वाट्याला एक टक्का निधी आला आहे. त्यामुळे आता यापुढे कोकणवर कोणत्याही प्रकारचा अन्याय शिवसेना सहन करणार नाही, असे मंत्री कदम यांनी स्पष्ट केले.

‘भाजपची सुपारी घेऊन सेनेवर राणेंची टीका’

प्रकल्प रद्द करावा, अशा आशयाची पत्रं पर्यावरण खात्याने दिलेली आहेत. मात्र,  नारायण राणे यांनी मी पत्र दिले नसल्याचा आरोप केला आहे. ते त्यांनी सिद्ध करावे. आरोप सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ; अन्यथा  राणे यांनी राजकीय संन्यास घ्यावा. राणे यांनी सध्या भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. त्यांच्या टीकेला उत्तर द्यायचे नाही, असे सेनेनेच ठरवले आहे. मात्र, माझ्यावर वैयक्तिक टीका झाल्यानेच त्याला मी उत्तर देत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला बदनाम करण्याचे काम राणे यांनी थांबवावे. कोकणी जनतेचा त्यांच्यावरील विश्‍वास उडाला आहे, असे कदम म्हणाले.