Sat, Dec 14, 2019 01:59होमपेज › Konkan › दापोलीत कुणबी मतदारांसमोर खुला पर्याय

दापोलीत कुणबी मतदारांसमोर खुला पर्याय

Published On: Jun 05 2019 1:29AM | Last Updated: Jun 04 2019 10:27PM
चिपळूण : प्रमोद पेडणेकर

लोकसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार अनंत गीते यांनी मताधिक्य घेतले असले तरी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार योगेश कदम यांची राष्ट्रवादीच्या संजय कदमांशी जोरदार लढाई रंगणार आहे. या मतदारसंघात किमान 40 हजाराचे मताधिक्य सेनेने गृहीत धरले असताना मताधिक्याचा टक्‍का घसरल्याने राष्ट्रवादीच्या संजय कदम यांची उमेद वाढली आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर असलेला कुणबी पट्टा लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती. या मतदारसंघाने सातत्याने गीते यांना चाळीस ते पन्‍नास हजारांचे मताधिक्य दिले आहे. यावेळीही नाराजी असली तरी कुणबी मतांच्या जोरावर मोठी आघाडी गीते यांना मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. सुनील तटकरेंनी निर्णायक रणनीती आखली. गीतेंच्या निष्क्रिय कारकिर्दीचा ठपका त्यांनी कुणबी समाजातही रूजवला. आपले व्हीजन समोर ठेवले. सेना-भाजपातील असंतुष्टाना ताब्यात ठेवले. त्यामुळे गीते यांचे मताधिक्य 16 हजारावर थांबले. येथेच तटकरेंनी निवडणूक अर्धी जिंकली. 

विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळे आयाम असणार आहेत. रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असून त्यांना राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्याशी टक्‍कर द्यावी लागेल. विधानसभेची सेमी फायनल म्हणून शिवसेना व राष्ट्रवादीने या निवडणुकीकडे पाहिले. स्वत: रामदास कदम यांनी दापोली मतदारसंघात प्रचाराची सूत्रे हातात ठेवली होती, तर संजय कदम यांनी तटकरे यांची प्रचाराची सूत्रे गतिमान ठेवली. लोकसभा निवडणुकीत गीते यांना या मतदारसंघात असलेल्या कुणबी बहुल पट्ट्यामुळे 16 हजारांचे मताधिक्य मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र कुणबी उमेदवार नसल्याने कुणबी मतदारांसमोर पर्याय खुले आहेत. रामदास कदम व गीते यांच्यात गेली अनेक वर्षे वितुष्ट होते. परंतु गेल्या वर्षभरात त्यांच्यातील बेबनाव संपुष्टात आला होता. योगेश कदम यांना गीते यांची ताकद मिळावी यासाठी स्वत: रामदास कदम यांनी गीते यांच्याशी संधान बांधले होते. लोकसभा निवडणुकीत रामदास कदम यांच्या पुढाकाराने दापोली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आलेल्या विकास निधीमुळे गीतेंना मोठे मताधिक्य मिळेल असा कदम यांचा होरा होता. परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्यासाठी गीते यांचा पाठिंबा मिळवून त्यांच्याशी रूजवात ठेवावी लागणार आहे. योगेश कदम हे तरूण आहेत व गेल्या तीन वर्षात त्यांनीही मतदारसंघात चांगला संपर्क वाढविला आहे. त्यांच्या वक्‍तृत्वात सुधारणा आहे. परंतु राजकीय गणितांची त्यांना नव्याने मांडणी करावी लागेल. याउलट संजय कदम यांचाही परफॉर्मन्स व जनसंपर्क दमदार राहिला आहे. तटकरे यांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी असल्याने तेही नव्या दमाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीत दापोली मतदारसंघात वंचित आघाडीने घेतलेले मतदान यामुळे तटकरेंचे मताधिक्य कमी झाल्याची चर्चा आहे. त्यावरही संजय कदम यांना अभ्यास करावा लागेल.

एकंदरीतच दापोली विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मिळालेल्या मताधिक्यावर अवलंबून राहणे शिवसेनेला परवडणारे नाही. शिवसेनेचा घटणारा जनाधार त्याची कारणे आता स्थानिक नेत्यांना तपासावी लागतील. गीते यांच्याविषयी नाराजीची भावना सर्वच मतदारसंघात होती. ते एक कारण असले तरी एकमेव कुणबी समाजाचा नेता सध्या राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याने समाजाच्या लौकिकासाठी त्यांना साथ द्यावी ही भावना मतदानापूर्वी दोन दिवस अगोदर भावनिकपणे रूजविण्यात आली. त्याचाही दापोलीत मताधिक्यासाठी फायदा गीतेंना झाला. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संजय कदम व योगेश कदम यांच्यात सामना रंगणार असला तरी तटकरे विरुद्ध अनंत गीते या लढाईचा आशय या निवडणुकीला असल्याने उत्तर रत्नागिरीतील या महत्त्वाच्या मतदारसंघावर कुणाचा वरचष्मा राहील हे सिद्ध होणार आहे.