Thu, Nov 22, 2018 16:11होमपेज › Konkan › नाविक भरतीत मच्छीमारांच्या मुलांना संधी

नाविक भरतीत मच्छीमारांच्या मुलांना संधी

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 7:54PMरत्नागिरी : प्रतिनिधी

संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. मच्छीमार बांधवांच्या पाल्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी तटरक्षक अवस्थान रत्नागिरीमार्फत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून जनजागृती करण्यात येत आहे.

ही भरती नाविक (जनरल ड्युटी) या पदासाठी असून फक्‍त पुरूष उमेदवारांकडून 1 जुलै ते 10 जुलैपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र) ही आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी 45 टक्के गुण आवश्यक आहेत आणि उमेदवाराची किमान उंची 157 सेमी, छाती फुगवून 5 सेमी जास्त अशी शारीरिक पात्रता आवश्यक आहे.

वयाची मर्यादा 18 ते 22 वर्षे (जन्म 01 फेब्रुवारी 1997 ते 31 जानेवारी 2001 च्या दरम्यान झालेला असावा) असून अनुसूचित जाती-जमातीसाठी  5 वर्षे व इतर मागास वर्गासाठी 3 वर्षे सूट आहे. निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्‍ती संपूर्ण भारतात तटरक्षक दलाच्या कार्यालयामध्ये व जहाजांमध्ये कोठेही करण्यात येईल. संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. नाविक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै आहे. त्याची परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये घेण्यात येईल व त्यासाठीचे प्रवेशपत्र 21 ते 31 जुलै दरम्यान पात्र उमेदवारास पाठवले जाईल. तरी इच्छुक उमेदवारांनी www.joinIndiancoastguard.gov.in या वेबसाईटवर जाऊन तेथे अर्ज करावेत. जर उमेदवारांना काही अडचणी आल्यास त्यांनी भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी विमानतळ येथे संपर्क साधावा.

मच्छीमार हे सागरी सुरक्षिततेसाठी मोलाचा वाटा उचलत आहेत. त्यांच्या पाल्यांना तटरक्षक दलामध्ये उपलब्ध प्रत्येक संधीचा फायदा पोहोचविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये प्रबोधन केले जात आहे.