Mon, Jul 13, 2020 16:25होमपेज › Konkan › ‘सी वर्ल्ड’ चा केवळ राजकीय आभास!

‘सी वर्ल्ड’ चा केवळ राजकीय आभास!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आ. वैभव नाईक यांनी ‘सी वर्ल्ड’  रद्द केल्याचे पत्र घेवूनच गावात भेटीला यावे, असे आव्हान  वायंगणी ग्रामस्थांनी 3 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या  बैठकीत  दिले होते. आज या घटनेला आता सुमारे सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. परंतु  ‘सी वर्ल्ड’  बाबतचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे.  दरम्यान जुलै- 2017 मध्ये झालेल्या आमसभेतही  सी वर्ल्डवरून आमदारांना विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला होता. एकूणच ‘सी वर्ल्ड’ हा विषय केवळ राजकीय स्वार्था पुरताच मर्यादित राहिला आहे. प्रत्यक्षात ‘सी वर्ल्ड’ च्या निर्मितीसाठी  ग्रामस्थांचा  विश्‍वास संपादन करण्यासाठी  एकाही राजकीय पक्षाने वा नेत्याने प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे वास्तव आहे.\

मालवण तालुक्यातील तोंडवळी व वायंगणी समुद्र किनार्‍यावर प्रस्तावित बहुचर्चित सी वर्ल्ड प्रकल्प जाहीर झाल्यापासूनच तो वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. या प्रकल्पा विषयी स्पष्ट माहिती जबाबदार लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन कुणीच  देत नसल्याने   ग्रामस्थ संभ्रमात आहेत. अखेर 24 ऑगस्ट 2013 रोजी वायंगणी-तोंडवळी ग्रामस्थांनी सी वर्ल्ड प्रकल्पाविरोधात गाव बचाव समिती स्थापना केली. या समितीने व ग्रामस्थांनी या प्रकल्पा विषयी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. मात्र ग्रामस्थांच्या या सवालांचे योग्य निराकरण करण्यात लोकप्रतिनिधींना स्वारस्य नाही. किंबहुणा त्याची गरज ही त्यांना वाटत नाही. कारण प्रत्येकाला या मुद्दयाचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करायचा आहे.  सत्तांतर झाले तरी अविश्‍वास कायम 

सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोध दर्शविताना ग्रामस्थानी  मांडलेली आजवरची भूमिका तपासली तर आपल्या लक्षात येते की ग्रामस्थांना अंधारात ठेवून प्रकल्पाची व्याप्ती 250 एकरावरून  तब्बल 1390 एकरापर्यंत नेण्यात आली आणि हीच बाब प्रकल्पाविषयी अविश्‍वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. वायंगणी- तोंडवळी गावांच्या माळरान  कातळ असून तेथे गवतही उगवत नाही असे सांगितले गेले. पण 1390 एकरात कोणकोणता भाग येतो हे ग्रामस्थांना माहिती आहे. ग्रामस्थांच्या प्रखर विरोधामुळे हा प्रकल्प आता सुमारे 450 एकरात होईल असे विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर सांगत आहेत. परंतु हा पर्यायसुद्धा ग्रामस्थांना रुचलेला दिसत नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम ठप्पच आहे. जोपर्यंत लोकांचा विश्‍वास संपादन करण्याचे शिवधनुष्य राजकीय पुढारी समर्थपणे पेलवून दाखवत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाचे भवितव्य हे अंधकारमयच राहणार आहे.