Tue, Jul 16, 2019 09:46होमपेज › Konkan › रत्नागिरीतील वृद्धाची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरीतील वृद्धाची ऑनलाईन फसवणूक

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:59PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

‘भीम अ‍ॅप’च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्डचा 16 अंकी नंबर घेत 20 हजार रुपयांची ऑनलाईन खरेदी केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूर्यकांत विश्‍वनाथ घाग (60, रा. बोर्डिंग रोड, रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार 16 डिसेंबर रोजी सुर्यकांत घाग यांनी आपल्या खात्यातून ‘भीम अ‍ॅप’द्वारे चुकीच्या खात्यात 1200 रुपये जमा केले होते. याबाबत त्यांनी ‘भीम अ‍ॅप’च्या कस्टमर केअरला फोन करुन माहिती दिली होती. दुपारी 3.30 वा. सुमारास घाग यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरुन एक फोन आला होता. फोन करणार्‍याने मी ‘भीम अ‍ॅप’च्या कस्टमर केअरमधून बोलत असून तुमची काय तक्रार आहे असे विचारले.

त्यावर घाग यांनी आपली तक्रार सांगितली. त्यावर फोन करणार्‍या तोतयाने तुम्ही मला तुमच्या एटीएम कार्डचा 16 अंकी नंबर दिला तर लगेच तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा करतो, असे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून घाग यांनी नंबर दिला. मात्र थोड्यावेळाने घाग यांच्या मोबाईलवर त्यांच्या बँक खात्यातील 20 हजार रुपयांची ऑनलाईन खरेदी केल्याचा मेसेज आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.