Fri, Jul 19, 2019 05:08होमपेज › Konkan › मोटारसायकल अपघातात एक ठार

मोटारसायकल अपघातात एक ठार

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 01 2018 11:26PMमाणगांव : वार्ताहर

माणगाव-कुंभारवाडी येथे दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या भीषण अपघातात नानेली वरची ढेपगाळूवाडी येथील चंद्रकांत ऊर्फ बाबू भिकाजी परब (वय 50) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच  मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी 2:30 वा.च्या सुमारास माणगाव-कुंभारवाडी येथे घडला. या अपघातानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मृताच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतल्याने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

चंद्रकांत भिकाजी परब हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन माणगांव-बेनवाडी येथून माणगांव बाजारमार्गे नानेलीच्या दिशेनेे जात होते. यावेळी माणगांव ते आंबेरी असा प्रवास करणार्‍या ब्लेस सायर डिसिल्वा यांच्या मोटारसायकलला समोरासमोर चंद्रकांत परब यांची मोटरसायकल  आदळून  मोठा आपघात झाला. या अपघात डिसिल्वा यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर चंद्रकांत परब हे रस्त्यावर जोरदार आदळल्यामुळे  त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाला. येथील युवा शिवसेनेचे योगेश धुरी व परेश धुरी यांनी  त्यांना तात्काळ माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डिसिल्वा  यांच्यावर माणगांव आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. 

अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलिस दुरक्षेत्र विभागाचे  हे.कॉ हावळ व धोत्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात घटनास्थळी उपस्थित झाले. जोपर्यंत मोटारसायकलस्वार डिसिल्वा  किंवा त्यांचा नातेवाईक घटनास्थळी हजर होत नाही तोपर्यंत चंद्रकांत परब यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. अशी ठाम भुमिका परब यांच्या नातेवाईक व मित्रपरीवाराने घेतली. यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आबा मुंज, पांडुरंग कोडसकर, योगेश धुरी,आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत परब हे घरात एकमेव कर्ते पुरूष हाते. त्यांच्या या अपघातामुळे परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

धुमस्टाईलचाच हा बळी

माणगांव बाजार व तिठ्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार वाढत आहे. त्यातच गेले काही वर्ष या रस्त्यांवर धुमस्टाईल मोटारसायकलस्वरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी याचा हे धुमस्टाईल युवक फायदा घेत आपल्या धुमस्टाईलची पूरेपुर हौस भागवतआहेत. हा धुमस्टाईलचाच बळी असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांमधुन केला जात आहे. निदान आता तरी पोलिस यंत्रणेने याकडे लक्ष देवून अशा धुमस्टाइलस्वारांना आवर घालावी अशी मागणी माणगांव वासीयातून होत आहे.