Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Konkan › चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला

चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:20PMचिपळूण : प्रतिनिधी

मुंबई व पुण्यासारख्या शहरातून मे महिन्याच्या सुट्टीत चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणातील आपल्या गावी येतात. आता हेच चाकरमानी परतीच्या प्रवासाकडे वळले असल्याने एसटी व रेल्वे स्थानकांत गर्दी होत आहे.

चिपळूण आगाराने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन परतीसाठी 22 जादा गाड्या सोडल्या आहेत. कोकणात शिमगोत्सव, गणेशोत्सव व मे महिन्याच्या सुट्टीत चाकरमानी गावी येतात. त्यामुळे गाड्यांना प्रचंड गर्दी होते. यंदा मे महिन्यात लग्नसराईचे मुहूर्त जास्त असल्याने गर्दीमध्ये भर पडली. कोकणात मौजमजा आणि विरंगुळ्यासाठी चाकरमानी येत असतात. मात्र, आता मे महिना संपत आल्याने सर्वच बस व रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे.

चिपळूण आगारातसुद्धा परतीच्या प्रवासाकरिता प्रवाशांची गर्दी होत आहे. तालुक्यातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आगारातून 22 जादा गाड्या सोडल्या आहेत. 
मुंबई, पुणे, बोरीवली व ठाणे या शहरांत जाण्यासाठी जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होत आहे.प्रवाशांच्या रांगा आगारात दिसून येत आहेत. कोकण रेल्वे गाड्यांना सुद्धा प्रचंड गर्दी आहे. कित्येक प्रवासी रेल्वेस्थानकातून प्रचंड गर्दी असल्याने माघारी फिरत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांचा फायदा कोकणी माणसाला होत नसल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.

रेल्वेसह एसटीलाही पसंती

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मात्र, आजही रेल्वेच्या सुपरफास्ट प्रवासात सुद्धा कोकणची लालपरी प्रवाशांच्या सेवेत कायम रूजू असून तीच प्रवाशांना हवीहवीशी वाटते. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी चिपळूण आगार प्रयत्न करीत आहे.