Sat, Dec 14, 2019 01:59होमपेज › Konkan › खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Published On: Jan 31 2019 1:30AM | Last Updated: Jan 30 2019 10:23PM
सावंतवाडी : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी युतीचा उमेदवार शिवसेनेचा असेल  अशा प्रकारची  सकारात्मक चर्चा बुधवारी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या  बैठकीमध्ये झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  सर्व तालुका प्रमुखांना  या बैठकीमध्ये  उपस्थित राहण्याचे आदेश  पक्षप्रमुखांनी दिले होते.  या बैठकीमध्ये  झालेल्या चर्चेमध्ये  शिवसेना पक्षातून  अन्य कोणीही इच्छुक नसल्याने तसेच  स्टँडिंग उमेदवार विद्यमान खा.विनायक राऊत हे असल्याने  तेच निवडणूक रिंगणात असतील. भले  शिवसेना भाजपची युती झाली तरी  शिवसेनेचा  उमेदवार 2019 च्या निवडणुकीमध्ये रिंगणात असेल  अशीच चर्चा झाल्याचे वृत्त आहे.  

बैठकीला पालकमंत्री दीपक केसरकर,खा.विनायक राऊत, जिल्हाप्रमुख  आ.वैभव नाईक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर  यांचीही उपस्थिती होती.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभा उमेदवारीसाठी माजी खा. नीलेश राणे हे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खा.विनायक राऊत यांनाच उमेदवारी देण्यात येणार असून त्यादृष्टीने  शिवसेनेच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, लोकसभा मतदार संघासाठीचे उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच जाहीर करणार आहेत.  युती झाली तरीही ही जागा शिवसेनेकडे राहणार यावर शिक्कामोर्तब झाल्याने  स्वाभिमान पक्षाला स्वबळावरच लढावे लागणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. 

या बैठकीमध्ये सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह दोडामार्ग तालुका प्रमुुख बाबुराव धुरी, वेंगुर्ले तालुका प्रमुख बाळा दळवी, कणकवली तालुका प्रमुख प्रथमेेश सावंत,  मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके,सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब उपस्थित होते.बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पक्षाच्या कामांबाबत आढाावा घेण्यात आला.