Sun, Dec 15, 2019 03:23होमपेज › Konkan › वेळगिवे येथे घटना :  दागिने चोरण्यासाठी केले होते कृत्य

वृद्धेचा खून; तरुणाला जन्मठेप

Published On: Feb 12 2019 1:06AM | Last Updated: Feb 12 2019 1:06AM
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

अंगावरील दागिने जबरदस्तीने चोरण्याकरिता घरातील कोयत्याने माहेरी आलेल्या सुमित्रा वामन दळवी (75) या वृद्धेचा खून केल्याप्रकरणी मुकेश साटम यास जन्मठेप व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी सुनावली. या खून प्रकरणाचा तपास विजयदुर्गचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, पो.हे.कॉ.राजन जाधव, पो. नाईक गुणीजन, मनोज साळवी, तांबे, संदीप पाटील, पोलिस उपविभागीय कार्यालयाचे पो. हवालदार करंगुटकर, राकेश कडूलकर यांनी केला होता.

सुमित्रा दळवी या वृद्धेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वेळगिवे-गावठण येथे 27 जून 2017 रोजी सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास घडली होती. या वृद्धेवर प्राणघातक हल्ला करून दागिन्यांसह रोख 1 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून मुकेश राजेश साटम हा फरार झाला होता.

मुटाट - पाळेकरवाडी येथील  सुमित्रा वामन दळवी ही महिला तिच्या माहेरी वेळगिवे गावठण येथे सदानंद लाड यांच्या घरी 27 जून 2017 रोजी सकाळी शेतीकामात मदत करण्यासाठी आली होती. याच दिवशी सदानंद लाड यांच्या पत्नीच्या बहिणीचा नातू मुकेश राजेश साटम (वय 22, रा. नाद) हा  लाड यांच्या घरी आला होता.

दुपारनंतर लाड कुटुंब शेतात गेले होते. यावेळी सुमित्रा दळवी व मुकेश असे दोघेजण घरात होते.घरातील सर्वजण शेतात गेल्याची संधी साधून मुकेश यांने दागिने चोरण्याचा इराद्याने सायंकाळी 4 ते 5 वा.च्या.  सुमारास  सुमित्रा दळवी यांच्या मानेवर व हातावर कोयत्याने वार करून त्यांचा गळ्यातील दोन तोळे वजनाची सुमारे 50 हजार रुपये किंमतीची माळ हिसकावून घेतली. त्यानंतर घरातील   पेटीत ठेवलेले सदानंद लाड यांच्या पत्नीचे मंगळसूत्र, नथ, अंगठी व रोख हजार रूपये असा एकूण 1 लाख 16 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला होता.

सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास सदानंद लाड यांचा मुलगा प्रल्हाद घरी बैल बांधण्यासाठी आला असता सुमित्रा दळवी रक्‍ताचा थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.त्यांनी तत्काळ धावाधाव करून घरातील मंडळींना व आजुबाजूच्या लोकांना बोलावून घेवून गंभीर जखमी सुमित्रा दळवी यांना फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.  तेथून त्यांना सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकारानंतर दागिने व रोख रक्‍कम घेवून संशयित मुकेश साटम हा हल्ला करण्यासाठी वापरलेले कोयते तेथेच टाकून पसार झाला होता. त्याला 2 जुलै 2017 रोजी सायंकाळी ठाणे येथे  पकडले होते. विजयदुर्ग पोलिसांनी आरोपी मुकेश साटम याच्याविरुद्ध भादंवि कलम 302,397 आणि 394 नुसार गुन्हा दाखल केला होता.  त्यानंतर जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

22 साक्षीदार तपासले

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. न्यायालयाने एकूण 22 साक्षीदार तपासले. फिर्यादी प्रल्हाद यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपी मुकेश हा गुन्हा करून जात असताना त्याला काही व्यक्‍तींनी पाहिले होते. त्यांची साक्षही महत्त्वाची ठरली आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही वस्तुस्थितीजन्य पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाला असल्याचे सरकारी वकील सूर्यकांत खानोलकर यांनी सांगितले. 

.......आणि आरोपी कोसळला

जिल्हा न्यायालयात मुकेश याला सोमवारी खून प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनाविली आणि ही शिक्षा ऐकल्यानंतर आरोपी मुकेश हा अक्षरशः हादरून गेला. त्याला न्यायालयाबाहेर येणेही शक्य होईना. तो जवळजवळ खालीच कोसळला. लागलीच त्याला येथील पोलिसांनी पाणी पाजले. या शिक्षेच्या सुनावणी वेळी मुकेश याचे वडीलही उपस्थित होते. त्यांचा चेहराही रडवेला झाला होता.